नूतन मराठा महाविद्यालयात कष्टकरी पालक महिलांचा सन्मान

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नूतन मराठा महाविद्यालयात विविध क्षेत्रांतील कष्टकरी माता-पालकांचा सन्मान सोहळा पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांना शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

प्राचार्य डॉ. देशमुख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “समाजाच्या तळागाळातील महिला ज्या कठोर परिश्रम घेत आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी झटत असतात, त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. जसे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील महिलांचे योगदान मोठे आहे, तसेच या सामान्य वाटणाऱ्या पण असामान्य काम करणाऱ्या माता-पालकांचेही स्थान तेवढेच महत्त्वाचे आहे.”

या कार्यक्रमात संगीता चौधरी, वैशाली वाणी आणि आशा सुरवाडे यांना आपल्या अनुभवाविषयी बोलताना गहिवरून आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष वैशाली वाणी यांच्यासह सरला महाजन, सुरेखा शिरसाठ, कविता सोलंकी, शुभांगी भांडारकर, संगीता पवार, मीना माळी, मनिषा माळी, मुक्ता जाधव, गीता वाघ, सुमन चांगरे, कल्पना पाटील या महिलांचा सन्मान करण्यात आला.

यासोबतच शहादा येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या दुहिता पाटील, साक्षी पाटील, दिपाली सुरवाडे, प्रियंका सैनी आणि अनुश्री कोळी या विद्यार्थिनींचे प्राचार्य डॉ. देशमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रत्नाकर कोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. घनश्याम पाटील यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. एम. एस. पाटील, डॉ. के. बी. पाटील, प्रा. संजय पाटील, डॉ. इंदिरा पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content