मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी विविध मागण्या मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारताच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यानंतर त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
आज जागतिक महिला दिनानिमित्त, रोहिणी खडसे यांनी सकाळीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करून थेट राष्ट्रपतींना महिलांना स्वसंरक्षणासाठी खून करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच, खडसे यांनी महिलांच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी सह्याद्री गेस्ट हाऊस गाठले.
सह्याद्री गेस्ट हाऊस येथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन स्वीकारावे अशी मागणी केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेट नाकारली, त्यामुळे रोहिणी खडसे संतप्त झाल्या. त्यांनी आंदोलन सुरू करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
यानंतर रोहिणी खडसे यांनी आणखी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून सरकारवर दडपशाहीचा आरोप केला. “मी महिलांच्या मागण्या मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती, पण ती नाकारण्यात आली. पोलिसांनी मला अडवले, हा लोकशाहीचा अपमान आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी खडसे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने त्वरित ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्याने हा विषय आणखी गाजण्याची शक्यता आहे.