अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुकान टाकण्यासाठी आणि शेतीसाठी माहेराहून २ लाख रुपये आणावे अशी मागणी करत अमळनेर तालुक्यातील निम येथील माहेरवाशीणीला सासरी धुप खुर्द येथे मारहाण करून छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात मारवड पोलीस ठाण्यात पतीसह सासू आणि दीर या तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील निम या गावातील माहेर असलेल्या दिव्या गणेश कोळी वय-२२ यांचा विवाह चोपडा तालुक्यातील धूप खुर्द येथील रहिवासी गणेश रोहिदास कोळी यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती गणेश कोळी याने विवाहितेला माहेराहून दुकान टाकण्यासाठी आणि शेतीसाठी २ लाख रुपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही, या रागातून तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सासू आणि दीर यांनी देखील दमदाटी करून मानसिक व शारीरिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता या माहेरी निघून आल्या.दरम्यान त्यांनी मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पती गणेश रोहिदास कोळी, सासू हिरकनबाई रोहिदास कोळी आणि दीर किरण रोहिदास कोळी तिघे रा. धूप खुर्द ता. चोपडा या तिघां विरोधात मारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे हे करीत आहे.