मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील बस्थानकात ग्रामीण भागातून ये-जा करणार्या विद्यार्थीनींची टारगट तरूण छेड काढत असल्याचे धक्कादायक प्रकार घडत असून येथे पोलीस बंदोबस्त लावावा, तसेच बस फेर्यांचे व्यवस्थीत नियोजन करावे अशी मागणी आज रोहिणी खडसे यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुक्ताईनगर आगारा अंतर्गत मुक्ताईनगर व बोदवड तालुका येतो. शाळा महाविद्यालय सुरू होऊन एक आठवडा उलटत आला तरी मुक्ताईनगर बोदवड तालुक्यातील ग्रामिण भागातील बसफेर्या सुरू न झाल्यामुळे या बसफेर्या नियमित सुरू करण्यासाठी आणि इतर मागण्यांसाठी मुक्ताईनगर आगरप्रमुख साठे यांना महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा तर्फे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, आता शैक्षणिक वर्ष २०२२-०२३ च्या शाळा महाविद्यालय नियमित सुरू झाले आहेत. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुक्ताईनगर बोदवड या तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. विद्यार्थी हे गरीब घरातील विद्यार्थी असल्या कारणाने त्यांना ये जा करण्यासाठी सर्वस्वी बस वर अवलंबुन राहावे लागते परंतु ग्रामिण भागातील बसफेर्या सुरू न झाल्यामुळे प्रसंगी त्यांना खाजगी प्रवासी वाहनाने प्रवास करून शाळा महाविद्यालयात यावे लागत आहे. सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी बांधवांना बि बियाणे, खते खरेदी करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. परंतु बसफेर्या सुरू नसल्याने शेतकरी वर्गाला सुद्धा खाजगी वाहनाने तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते यात खाजगी वाहने अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारात असल्या कारणाने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतो तसेच खाजगी प्रवासी वाहने हे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवतात त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते.
याची दखल घेऊन आगारप्रमुखांनी बस फेर्यांचे व्यवस्थीत नियोजन करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे. तसेच ग्रामिण भागातील विद्यार्थीनी या शिक्षणासाठी ये-जा करत असतात या विद्यार्थिनी बसची वाट पाहत बसस्थानकात थांबल्या असताना बसस्थानक परिसरात फिरणारे मवाली हे मुलींची छेडखानी करण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा अनुचित घटना घडू नये यासाठी आगरप्रमुखानी लक्ष घालावे व बसस्थानकावर पोलिस कर्मचार्यांच्या नियुक्तीची पोलिस निरीक्षकांकडे मागणी करावी अशी मागणी देखील यात करण्यात आलेली आहे.
या निवेदनात शेवटी म्हटले आहे की, मुक्ताईनगर ही आदिशक्ती मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी आहे. त्या कारणाने मुक्ताईनगर तालुका आणि परिसरात वारकरी मोठया संख्येने आहेत. आषाढी एकादशी निमित्ताने पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाणार्या वारकर्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे वारकर्यांच्या सोयीसाठी मुक्ताईनगर आगाराने मुक्ताईनगर ते पंढरपुर बसफेर्यांचे नियोजन करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार,माजी सभापती विलास धायडे, प्रदिप साळुंखे,भागवत पाटील,राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजुभाऊ माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, सरचिटणीस रवींद्र दांडगे, सुनिल काटे, बाळा भाऊ भाल शंकर,प्रविण पाटील, बापु भाऊ ससाणे,अमिन खान,अनिल पाटील, संजय कपले,संजय कोळी, योगेश काळे, चेतन राजपूत,विनोद काटे, प्रकाश डहाके, ललित पाटील, एजाज खान,चंद्रकांत पाटील,विनोद महाजन,महेश पाटील, एकनाथ प्रधान आदी उपस्थित होते.