जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी याचे सावट पूर्णपणे दूर झालेले नाही. मात्र गेल्या वर्षापेक्षा यंदाची दिवाळी ही अधिक आशादायक आणि चांगल्या भविष्याची ग्वाही देणारी ठरली आहे. गत वर्षातील कटू आठवणींवर दिपोत्सवाचे चैतन्य मात करेल असा आशावाद व्यक्त करत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर आपण वायफळ बडबड करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर भर देत असून विविध विकासकामांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना याची प्रचिती आली असेलच असे प्रतिपादन देखील पालकमंत्र्यांनी केले आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी ते बोलत होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांना दिवाळीच्या शुभेच्छा देतेवेळी म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाशी झुंज घेण्यातच आपली उर्जा जास्त प्रमाणात खर्च झाली. मात्र यंदाची दिवाळी हे आशांचे दीप प्रज्ज्वलन करणारी ठरली आहे. कोरोना काळातील कटू आठवणींना मागे सारत आपण नव्या उमेदीने आयुष्याची सुरवात केली असून यासाठी माझ्या आपल्याला मन:पूर्वक शुभेच्छा आहेत. यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी जेरीस आला असून राज्य सरकारतर्फे बळीराजाला त्याच्या न्याय्य हक्क प्रदान करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र विरोधक यात देखील राजकारण करत आहेत. मात्र आम्ही विरोधात असतांना जनतेला वेठीस न धरता, जनतेच्या मागण्यांसाठी मोर्चे काढून न्याय मिळवून देण्याचे काम केले होते. आज सत्तेत असतांना शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करून हेच काम करत आहोत. वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून यंदा मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने जिल्ह्यात विद्युत पोल, ट्रान्सफार्मर्स, डीपी आदींसाठी तब्बल ४१ कोटी रूपयांची मान्यता २ वर्षात प्रदान करण्यात आलेली आहे. शेत पाणंद रस्त्यांची कामे सर्वात पहिल्यांदा आणि सर्वाधीक प्रमाणात जळगाव जिल्ह्यात झालीत. तब्बल दर वर्षी पाच कोटी रूपये खर्च करून शेत रस्ते करण्यात येत असून याचा शेतकर्यांना लाभ होत आहे. याच प्रमाणे जिल्ह्यात पालकमंत्री संरक्षण भिंत योजनेचे यशस्वी कार्यान्वयन करण्यात आले असून यात डीपीडीसी, मनरेगा आणि चौदावा वित्त आयोग यांच्या संयुक्त निधीतून तब्बल ३०० शाळांना संरक्षण भिंती बांधण्यात आल्या आहेत. याशिवाय, पशुसंवर्धन दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, स्मशानभूमि, व्यायामशाळा, समाजगृहे, अंगणवाड्या व शाळाखोल्या बांधकाम आदी कामांना देखील गती देण्यात आलेली आहे. तर आपल्याकडे असणार्या पाणी पुरवठा खात्याच्या माध्यमातून जिल्हापरिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत जिल्ह्यातील अनेक पात्र गावांच्या पाणी पुरवठा कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकर्यांना मदत मिळाली नसल्याचा कांगावा विरोधकांनी केला आहे. मात्र २०२० पासून ते आजवर जिल्ह्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाईच्या माध्यमातून व पीक विम्याच्या माध्यमातून भरीव मदत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील फक्त ग्रामीण भागालाच नव्हे तर शहरी भागासाठी सुध्दा भरीव तरतूद करण्यात आली आहे. यात जळगाव शहरासाठी पहिल्यांदाच जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून तब्बल ६१ कोटी रूपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. शहराला जोडणार्या सर्व रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. नगरविकास खात्याकडून ४१ कोटी आणि अन्य विविध योजनांच्या माध्यमातून शहरासाठी तब्बल पावणे दोनशे कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून यामुळे जळगाव शहराचा चेहरा – मोहरा बदलण्यास सुरुवात झाली आहे. यात प्रामुख्याने रस्त्यांचे जाळे उभारण्याला प्राधान्य देण्यात आले असून याचा जळगाव शहरवासियांना लाभ होणार आहे.
जिल्ह्यातील इतर शहरांसाठी नगरोत्थान, दलीत वस्ती सुधार योजना आणि दलीतेतर वस्ती सुधार योजना यांच्या अंतर्गत १०० कोटींच्या वर निधी प्रदान करण्यात आला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्याच्या इतिहासात विकासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात आले असून आता कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. विकासात राजकारण नको, ही आपली पालकमंत्री म्हणून भूमिका असून याच भूमिकेशी प्रामाणिक राहत आपण वाटचाल सुरू ठेवली आहे. आगामी काळात याच प्रकारे विकासयात्रा कायम राहील अशी मी आपल्याला ग्वाही देतो. आपल्याला पुनश्च दिवाळीच्या शुभेच्छा…!