भालोद येथे पक्ष्यांसाठी हँगिंग वॉटर बर्ड फिडर कार्यशाळा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयात पर्यावरण क्लब आणि प्राणीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने पक्ष्यांसाठी हँगिंग वॉटर बर्ड फिडर तयार करण्यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अजय कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेत प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना रिकाम्या टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांपासून हँगिंग बर्ड वॉटर फिडर तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. नॅकचे प्रा. डॉ. गणेश चौधरी, आयक्यूएसी समन्वयक प्रा. राकेश चौधरी आणि प्रा. डॉ. मीनाक्षी वाघुळदे यांनी कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला.

उन्हाळ्याच्या तोंडावर तापमान वाढत असून, वन्यजीव आणि पक्षी पाण्याच्या शोधात फिरत असतात. त्यामुळे घराबाहेर, छतावर, झाडांवर किंवा संरक्षण भिंतीवर पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून देणे हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे मत प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी व्यक्त केले. पक्ष्यांनाही संवेदना असतात, त्यांच्या जगण्याची जबाबदारी आपली आहे, असे ते म्हणाले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. किशोर कोल्हे यांनीही हँगिंग वॉटर बर्ड फिडर उपक्रमाचे कौतुक करत, विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे फीडर आपल्या घराजवळ लावावेत आणि पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन केले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत हँगिंग वॉटर बर्ड फिडर तयार केले आणि महाविद्यालय परिसरातील झाडांवर लटकवले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीबाबत जागृती निर्माण झाली.

Protected Content