ओसामाचा मुलगा हमजाचा खात्मा; अमेरिकन मीडियाचा दावा

hamza bin laden obama bin laden son

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमजाच्या मृत्यूमागे अमेरिकेचा हात आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

अमेरिकेने हमजाचा पत्ता सांगणाऱ्याला 10 लाख डॉलर बक्षिस जाहीर केले होते. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हमजाकडून अमेरिकेवर हल्ला करण्याचे षडयंत्र रचण्यात येत होते. त्यामुळे अमेरिकेकडून हमजाला पकडण्यासाठी बक्षिस जाहीर केले होते. ओसामाचा मुलगा हमजा बिन लादेन दहशतवादी संघटनेत नव्याने उभा राहणारा चेहरा होता. एनबीसीने याबाबत अधिक माहितीसाठी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यांच्या संपर्क साधला. मात्र ट्रम्प यांनी हमजाला ठार केल्याच्या वृत्ताला नकारही दिला नाही आणि होकारही दिला नाही. याबाबत कोणतेही वक्तव्य देण्यास त्यांनी नकार दिला.

 

ओसामा बिन लादेनची एकूण 20 मुले आहेत, त्यापैकी हमजा 15 वा मुलगा आहे. ओसामा बिन लादेन प्रमाणे हमजा देखील इतर देशांना दहशतवादी हल्ल्याची धमकी देत होता. हमजा दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानमध्ये राहत असल्याची माहिती समोर येत आहे. लादेनच्या मृत्यूनंतर अल-कायदाची सूत्रे हाती घेतलेल्या अल जवाहिरीनंतर हमजाचेच वर्चस्व होते. मृत्यूआधी ओसामा बिन लादेन हमजाला आपला उत्तराधिकारी बनवण्याची तयारी करत होता. लादेनचा खात्मा केला त्यावेळी मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे ही माहिती समोर आली होती. दरम्यान,काही वर्षांपासून असेही मानले जात होते की, हामजा हा पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिरीया किंवा इराणमध्ये नजरकैदेत आहे. मात्र, आता त्याच्या मृत्यूचे वृत्त आले आहे.

Protected Content