
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री येथे शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ लाख ८६ हजार ३४ रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना गुप्त माहिती मिळाली होती की, धरणगावच्या दिशेने एका वाहनातून लाखोचा गुटखा जात आहे. त्यानुसार श्री.रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महादेव जानकर, पोहेकॉ रवींद्र घुगे,विनायक पाटील, प्रमोद लाडवंजारी, इद्रीस पठाण यांनी सापळा रचत एमएच १८,डब्ल्यू ४३३५ हि सफेद रंगाची कार पकडली. कारची झाडाझडती घेतली असता त्यात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. या गुटख्याची किंमत साधारण ५ लाख ८६ हजार ३४ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या संदर्भात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कार चालक रवींद्रसिंग राजपूत (रा.जळगाव) याची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.


