जळगाव प्रतिनिधी । गुरु-शिष्यांच्या परंपरेमुळेच भारतीय संस्कृती जगात घट्ट पाय रोवून उभी आहे. जीवनाला योग्य दिशा, मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि आशीर्वाद जीवनात मिळण्याचे केंद्रबिंदू म्हणजे ‘गुरु’ होय.
खरंतर गुरुची मंहती शब्दात व्यक्त करता येत नाही, ते व्यक्त केल्यास समुद्रमंथनात पाणी शिंपडल्यासारखा त्याचा अर्थ होतो. गुरु प्रतीचा आदरभाव, प्रेम व निष्ठा कृतीतून व्यक्त करता येते. गुरुंनी दाखवलेल्या मार्गावर चालणे, त्यांनी शिकवलेल्या तत्वांच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणे तेही निःशंकपणे कारण कोणताही गुरु शिष्याला अधोगतीच्या अंधारात लढायला शिकवतो. शिष्य भौतिक, अध्यात्मिक ज्ञानाच्या शिखरावर सर्वोच्च पदावर पोहोचावा. एका विशिष्ट परिघाबाहेर जाऊन त्याने यशवंत, किर्तीवंत व्हावे. कदाचित याच सोज्वळ-निखळ, निर्विकारी वृत्तीमुळे मानवी जीवन जगत असला तरी गुरूला देवाचे स्थान प्राप्त झाले आहे.
आई-वडील-परिवारातील सदस्य-शिक्षक हे माझ्या गुरुस्थानी आहेतच. पण त्याचबरोबर माझ्यासोबत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या असणारे सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, मार्गदर्शक, हितचिंतक किंबहुना समाजातील, निसर्गातील सर्व घटक जो मला नेहमी काहीतरी नवीन शिकवत असतो. शिकण्यासाठी तत्पर ठेवत असतो. चांगले घ्यावे बाकी अवघे त्यागावे हेही शिकवत असतो. त्यांच्या कृतीतून त्यांच्या अनुभवातून. ते मी नक्की जपण्याचा प्रयन्त करेन.