चुंचाळे येथे उद्या अनोखा गुरू-शिष्य पुण्यतिथी सोहळा

c5b59cd1 e110 465c b85f d8e54f770348

धानोरा, ता. चोपडा (विलास सोनवणे) यावल तालुक्यातील चुंचाळे येथे गुरू रघुनाथ बाबा व शिष्य वासुदेव बाबा हे एकाच दिवशी वैशाख शुद्ध द्वादशीला समाधिस्त झाले होते, तेव्हापासुन एकाच दिवशी गुरू आणि शिष्य यांच्या पुण्यतिथीचा अनोखा सोहळा येथे साजरा होत असतो. यंदा उद्या (दि.१६ मे) श्री समर्थ वासुदेवबाबा दरबारात हा सोहळा होणार आहे.

 

श्री समर्थ सुकनाथबाबा हे काशी येथुन भ्रमण करीत चुंचाळे येथे आले आणि १२ वर्ष त्यांनी अखंड तप केले म्हणून तेव्हापासुन चुंचाळे या गावाला श्री समर्थ सुकनाथबाबा यांची तपभुमी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर त्यांचे शिष्य व सुपुत्र श्री समर्थ रघुनाथबाबा यांचा जन्म चुंचाळे येथे झाला, म्हणून त्यांची जन्मभुमी म्हणून हे गाव ओळखले जाते. या पिता पुत्राच्या समाधीचे स्थान (वर्डी ता. चोपडा) येथे आहे. सुकनाथबाबा १९३५ मध्ये तर रघुनाथ बाबा १९७९ मध्ये (वर्डी, ता.चोपडा) येथे समाधिस्त झाले. त्यानंतर श्री समर्थ वासुदेवबाबा हे रघुनाथबाबा सोबत राहत होते,

वासुदेवबाबा हे चुंचाळे गावात १९८० मध्ये आले. त्यांनी ग्रामस्थ व शिष्यांना सहकार्याने गावात भव्य मंदिर बांधण्यास प्रारंभ केला. तेव्हापासुन गावातील घराचे बांधकामही सुरू झाले. त्यानंतर १९८९ मध्ये श्री रघुनाथबाबा यांच्या मुर्तीची त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली तर श्री समर्थ सुकनाथबाबा यांच्या २१ किलो चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सन २००० मध्ये करण्यात आली. या मंदिराचा कळस ६१ फुट उंचीचा आहे. श्री समर्थ वासुदेवबाबा हे नेहमीच वैशाख शुद्ध द्वादशीला त्यांचे गुरू श्री समर्थ रघुनाथबाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम करीत असत. आपल्या गुरूचा हा पुण्यतिथी सोहळा आपण नसतानाही सुरू राहायला हवा म्हणून त्यांनीही गुरूच्या पुण्यतिथीच्या दिवशीच चुंचाळे येथे समाधी घेतली होती.

असा हा गुरू-शिष्य यांच्या पुण्यतिथीचा सोहळा वासुदेवबाबा दरबारात मोठया उत्साहाने साजरा केला जात असतो. या सोहळ्यात सकाळी ६.०० ला मारुती अभिषेक, ६.३० ला श्री समर्थ सुकनाथबाबा यांच्या मूर्तीला स्नान व मूर्ती अभिषेक, ६.३० आरती ८.३० पासुन भजन-भारूडांना सुरूवात, दुपारी १२.०० ला महाआरती होऊन १.०० वाजेपासुन महाप्रसादाला सुरूवात होईल. सर्व भाविकांनी यावेळी कार्यक्रम व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चुंचाळे ग्रामस्थांनी केले आहे.

Add Comment

Protected Content