गुरूपौर्णिमा म्हणजे आत्मचिंतनाचा दिवस : जनार्दन हरीजी महाराज

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गुरुपौर्णिमा म्हणजे सर्वांसाठी आत्मचिंतन करण्याचा दिवस. मी कोण आहे ? हे सत्य जाणून घेण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते असे प्रतिपादन महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. ते सतपंथ मंदिरात आयोजीत गुरूपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.

आज गुरपौर्णिमेचे औचित्य साधून सतपंथ देवस्थानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज म्हणाले की, आपण गुरु करतो परंतु गुरु कशासाठी केला हे विसरून जातो. आपल्याला मी कोण आहे याचे उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत गुरुकृपा होत नाही. माणसाचे जीवन अनमोल आहे. जे काही करायचे ते आजच करा. वेळ गेल्यानंतर पश्चाताप होतो. शिष्यासाठी गुरु हा पेटलेल्या ज्योती व अगरबत्ती सारखा असतो. स्वतः नियमित जळत असून शिष्याच्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाश व नियमित सुगंध देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य देत असतो.

जनार्दन हरीजी महाराज पुढे म्हणाले की, गुरु आणि गोविंद तसेच गुरु आणि देव भिन्न आहेत. साध्य भगवान तर साधन गुरु आहे गुरु हा पोस्टमन सारखे काम करतो. तो इतरांना मार्ग दाखवतो. त्यांची भूमिका दीपस्तंभ सारखी असते त्यासाठी दिशा दाखवणारे गुरु असतात. परमात्मा गुरु शिवाय मिळत नाही तरीही साध्य आपण भगवंताला मानले पाहिजे असे मौलिक विचार सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त उपस्थित भाविक भक्तांना सांगितले. ते पुढे म्हणाले की, गुरूंचा आदेश आपल्यासाठी सर्व काही असते.

महामंडलेश्‍वर याप्रसंगी म्हणाले की, गुरु जगन्नाथ महाराजांनी मला जे जे काम सांगितले ते ते मी स्वतः केले आणि आचरणात आणले म्हणून मला आज कोणतीच अडचण येत नाही. गुरूंचा आदेश आपल्यासाठी सर्व काही असते हेच गुरुतत्त्व असते. गुरु हे शिष्यांचे दोष व भोगही स्वीकारतात म्हणून गुरूंनी सांगितलेले वचन आपण पाळले पाहिजे. चिंता न करता चिंतन करा. भजन करा. मंत्र जप करा. आपला संसार सुखाचा होईल. मनुष्य योनीत आल्यावर गुरुकृपेने भगवंताची प्राप्ती करण्यासाठी गुरुतत्त्व आहे. आणि ह्या गुरुतत्त्वाची पूजा म्हणजे निर्व्यसनी राहून गुरूंच्या आदेशाचे त्यांनी सांगितलेले विचार स्विकारून मार्गक्रमण करणे हिच गुरु सेवा आहे आणि यासाठी गुरुपौर्णिमा उत्सव आहे. असे महाराजांनी आशीर्वचन देताना सांगितले.

या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी सतपंथ मंदिर संस्थानमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणाहून असंख्य भाविक भक्तांनी हजेरी लावून गुरुदेवांचे आशीर्वाद घेतले.

Protected Content