सुषमा अंधारे या तर तीन महिन्यांचे बाळ ! : गुलाबभाऊंची टीका

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आजपासून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा सुरू होत असतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये आजपासून महाप्रबोधन यात्रा सुरू होत आहे. राज्यभरात सुरू असलेल्या यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे. यातील प्रमुख आकर्षक हे अर्थातच शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे भाषण होय. अंधारे यांच्या भाषणांना तुफान लोकप्रियता मिळाली असून त्या फुटीर आमदारांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. अर्थात, जळगाव जिल्ह्यात देखील त्या पाचही मतदारसंघांमध्ये जोरदार भाषण करतील ही बाब उघड आहे.

दरम्यान, महाप्रबोधन यात्रा सुरू होण्याआधीच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर तोफ डागली आहे. चोपडा तालुक्यातील धानोरा येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, सुषमा अंधारे या तीन महिन्यांपूर्वीच शिवसेनेत आल्या असून त्या तीन महिन्यांचे बाळ आहेत. त्यांनी आधी हिंदू धर्मावर अतिशय खालच्या शब्दांमध्ये केलेली टिका ही सोशल मीडियात उपलब्ध आहे. तर उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यांच्या क्लीप्सदेखील दाखवाव्यात असा टोला देखील त्यांनी मारला.

Protected Content