मुंबई (प्रतिनिधी )– आपल्या घरातील मंगल कार्याची पहिली पत्रीका ही कुलदैवतेच्या गाभार्यात ठेवली जाते हे आपणा सर्वांना माहित आहेच. याच प्रमाणे आपला पक्ष हेच आपले कुळ आणि याचे संस्थापक अर्थात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच कुलदैवत असे मानणारे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपले चिरंजीव विक्रम यांच्या विवाहाची पहिली पत्रीका ही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर अर्पण करून आपली अनोखी दैवतनिष्ठा दाखवून दिली आहे.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांचा विवाह २९ नोव्हेंबर २०२१ रोजी पाळधी (ता. धरणगाव) येथे संपन्न होत आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी या विवाहाची पहिली पत्रीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अर्पण केली.
आज बाळासाहेबांचा महानिर्वाण दिन. यानिमित्त लक्षावधी शिवसैनिक शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावर असणार्या त्यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. ना. गुलाबराव पाटील हे देखील नित्यनेमाने शिवतीर्थावर अभिवादन करण्यासाठी जातात. या अनुषंगाने आज शिवतीर्थावरील स्मारकावर माथा टेकवतांना त्यांनी आपल्या चिरंजीवांच्या विवाहाची पहिली पत्रीका बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केली. याप्रसंगी त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या संदर्भात बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे माझ्यासारख्या असंख्य शिवसैनिकांचे दैवत आहे. आम्ही आमचा पक्ष शिवसेना हे एक कुटुंबच मानतो. आणि या कुटुंबाचे प्रमुख हेच आमचे कुळदैवत होय. कुणीही ज्या प्रकारे कुलदैवताच्या चरणी मंगल कार्याची पत्रीका अर्पण करून मगच या पत्रीकांच्या माध्यमातून इतरांना निमंत्रण देतो, अगदी त्याच प्रकारे मी आज वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी माझ्या पुत्राची पत्रीका ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.
दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांनी आधी सुध्दा आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रमाण मानून वाटचाल करत असल्याचे सांगितले आहे. शिवसेनाप्रमुखांचा जाज्वल्य विचार प्रमाणभूत मानून आणि विशेष करून त्यांचा ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा मूलमंत्र अंगीकारत एक नेता, एक विचार आणि एक झेंडा हाती धरत पक्षाचा सच्चा सैनिक म्हणून काम करत असल्याचे त्यांनी अनेकदा बोलून दाखविले आहे. तर आज, थेट आपल्या नेत्याच्या स्मारकाच्या चरणी आपल्या पुत्राच्या विवाहाची पत्रीका अर्पण करून त्यांनी आपली दैवतनिष्ठा अनोख्या पध्दतीत व्यक्त केली आहे.