मुंबई प्रतिनिधी । जळगावच्या आशादीप वसतीगृहात सांगण्यात आलेला प्रकार घडला नसून या प्रकरणी आरोप करणारी महिला ही ‘मनोरुग्ण’ असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत दिली.
जळगावातील आशदीप महिला वसतीगृहातील कथित व्हिडीओ प्रकरणाने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कालच उच्च स्तरीत समितीचे गठन करून चौकशी करून दोन दिवसात अहवाल मांडण्यात येईल असे जाहीर केले होते. यानुसार त्यांनी आज चौकशी अहवाल विधानसभेत मांडला असून यातून संबंधीत वसतीगृहात असले कोणतेही प्रकरण घडलेच नसल्याचे सांगितले.
यानंतर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी देखील या प्रकरणी सभागृहात निवेदन दिले. ना. पाटील म्हणाले की, आशादीप वसतीगृहातील कथित घटना ही एका वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर खळबळ उडाली. मी स्वत: जळगावचा पालकमंत्री असल्यामुळे या माध्यमातून आमच्या जिल्ह्याचे नाव चुकीच्या माध्यमातून जगासमोर गेल्याने वाईट वाटले.
या प्रकरणी गृहमंत्र्यांनी उच्च अधिकार्यांच्या समितीद्वारे चौकशी केली असता हे प्रकरण घडलेच नसल्याचे समोर आले. या प्रकरणी ज्या महिलेने आरोप केले तिच्या विरूध्द १७ वेळेस तक्रारी करण्यात आल्या आहेत. ती मनोरूग्ण असल्याचे आधीच समोर आले असून तिने केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.