लोकसभेची माळ गुलाबराव देवकरांच्याच गळ्यात ?

जळगाव प्रतिनिधी । स्वत: गुलाबराव देवकर यांची तयारी नसली तरी लोकसभा उमेदवारीची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विशेष बाब म्हणजे पक्षाध्यक्ष शरद पवार हेच देवकरांसाठी आग्रही असून त्यांना लोकसभेत पाठविण्यासाठी राष्ट्रवादीतील तमाम नेत्यांसह शिवसेनादेखील इच्छुक असल्यामुळे राष्ट्रवादीने येथून विजयाचे गणित मांडले आहे.

दुसरा तगडा उमेदवार नाहीच

आज पुण्यात राष्ट्रवादीने लोकसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित केलेली होती. या बैठकीत जळगाव लोकसभा मतदार संघासाठी पुन्हा एकदा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना विचारणा झाली असता, त्यांनी पुन्हा नकार दिला असल्याचे वृत्त आहे. परंतु आजच्या घडीला भाजपला तोड देण्यासारखा राष्ट्रवादीकडे देवकर यांच्यासारखा तगडा उमेदवार नाहीय, हे देखील तेवढेच खरे आहे. विशेष म्हणजे देवकर यांच्या विजयाचे काही डावपेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आखल्याचे देखील कळतेय. त्यामुळे राष्ट्रवादीतील विश्‍वसनीय सूत्रांनुसार लोकसभेची माळ गुलाबराव देवकरांच्याच गळ्यात पडणार असल्याचे बोलले जात आहे.

बहुतेक प्लस पॉइंट

गुलाबराव देवकर आजच्या घडीला लोकसभेसाठी नाही म्हणत असले तरी,पक्षाने आदेश दिल्यास त्यांना निवडणूक लढावीच लागणार आहे. देवकर हे मूळ चाळीसगाव तालुक्यातील असल्यामुळे त्यांना चाळीसगावमधून मताधिक्क्य मिळणे शक्य आहे. त्याचपद्धतीने देवकर यांचा रहिवास जळगाव शहरात आहे. नगरसेवक ते नगराध्यक्ष असा राजकीय प्रवास देखील त्यांचा जळगाव शहरातूनच झालाय. त्यामुळे सर्व आजी-माजी नगरसेवकांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. गतवेळी भाजपला जळगाव शहरातून मोठे मताधिक्य मिळालेले होते. यंदा येथून गुलाबराव देवकर राहिल्यास शहरातून त्यांना मोठे मताधिक्य मिळू शकते. दुसरीकडे जळगाव ग्रामीण मतदार संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केलेले असल्यामुळे या मतदार संघातून देखील त्यांना लीड मिळविणे कठीण नाहीय.

गुलाबराव पाटलांना मैदान मोकळे

सर्वात महत्वाचे म्हणजे देवकर लोकसभा लढत असल्यास शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्यासाठी मैदान मोकळे होणार आहे. देवकर लोकसभेत गेल्यास ना.पाटील यांच्या दृष्टीने तर विधानसभा अगदी एकतर्फी असेल. गुलाबराव पाटील यांची जळगाव लोकसभेतील शिवसैनिकांवर जबरदस्त पकड आहे. त्यामुळे ना. पाटील यांचा रस्ता मोकळा व्हावा म्हणून गुलाबराव देवकर यांचे काम अनेक शिवसैनिक करतील असा देखील अंदाज आहे. यासोबत जळगाव शहर, ग्रामीण, पाचोरा-भडगाव, एरंडोल-पारोळा आदी मतदारसंघांमध्ये भाजप व शिवसेनेत प्रचंड खुन्नस आहे. येथील शिवसेना ही भाजपच्या अरेरावीला आळा घालण्यासाठी देवकर यांच्यासारख्या मवाळ नेत्याला पडद्याआडून पुरेपूर रसद पुरवून भाजपला हिसका दाखवू शकतात.

राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांच्या मनात मंत्रीपदाचे मांडे !

त्याचपद्धतीने राष्ट्रवादीतील अनेक माजी आमदार देखील देवकर यांचे काम प्रामाणिकपणे करतील. कारण देवकर लोकसभेत गेल्यास त्यांचा मंत्रीपदाचा मार्ग मोकळा होण्याची आस त्यांना आहे. एकंदरीत वरील सर्व गोष्टीच शरद पवार यांच्या लक्षात आल्या असल्यामुळे त्यांनी देवकर यांनाच उमेदवारी देण्याचे ठरविले असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आर्थिक अडचण लक्षात घेता पक्षाने मदत करायचे आश्‍वासन दिल्यास देवकर हे शंभर टक्के लोकसभेच्या मैदानात दिसतील.

Add Comment

Protected Content