Home Agri Trends केळी उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षण कार्यक्रमात उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन !

केळी उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षण कार्यक्रमात उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रशिक्षण कार्यक्रम आज, बुधवारी (१६ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सकाळी ९.३० वाजता पार पडला. जळगाव कृषी विभाग (आत्मा) आणि महाराष्ट्र सहकारी विकास मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात केळीच्या उत्तम कृषी पद्धती आणि निर्यातक्षम उत्पादन यावर तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

नाशिक येथील विभागीय सहसंचालक सुभाष काटकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी नाशिक येथील पीआययुचे विभागीय प्रकल्प उपसंचालक शिवपुरी पुरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, जैन इरिगेशनचे के. बी. पाटील, तसेच प्रवीण वानखेडे आणि डॉ. व्ही. टी. गुजर या कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना केळी लागवड, कीड-रोग व्यवस्थापन, निर्यात प्रक्रिया यांसारख्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणास जळगाव जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमधूनही २२५ हून अधिक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या शेवटी, शेतकऱ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची तज्ज्ञांकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या शंकांचे निरसन झाले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात निर्यातक्षम केळी लागवड कशी करावी, केळी निर्यातीसाठीच्या संधी व गुणवत्ता मानके, केळी करपा रोगाचे प्रभावी व्यवस्थापन, केळी निर्यातीची कार्यपद्धती व आवश्यक मानके, मॅग्नेट प्रकल्पाविषयीची माहिती आणि त्याच्या विविध योजना तसेच वित्तीय व्यवस्थापन यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना केळी उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञान वापरून गुणवत्ता वाढवण्यास आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्यास निश्चितच मदत मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound