जळगाव (प्रतिनिधी)। शेतीकडे व्यावसाईक दृष्टीकोनातून रोजगार देणारी संस्था म्हणून बघणे आवश्यक आहे. याकरीता शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी सामुहिक विचारातून गटशेती केल्यास शेतकऱ्यांची उन्नती निश्चितपणे होईल. असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग, आत्मा जळगाव आणि कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा नियोजन भवनात शेतकरी मेळावा तथा जिल्ह्यातील 16 उत्कृष्ट शेतकरी आणि 3 शेतकरी गटांच्या सत्कार समारंभांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ना. पाटील बोलत होते.
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा आणि नियमित माती परिक्षण करून कृषि तज्ञांच्या शिफारशीबरोबरच बाजारपेठांचा विचार करुन शेतीचे नियोजन करावे. कृषि विभागाने जिल्हास्तराबरोबरच यापुढे तालुका तसेच गाव पातळीपर्यंत कृषि मेळाव्यांचे आयोजन केल्यास खऱ्या अर्थाने शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी उपयोगी योजनांचा लाभ पोहचविणे शक्य होईल. आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या मनोगतात शेतीला व्यावसाईक स्वरूप प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी यापुढे शेतीला आधुनिकतेची जोड देणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी शेतीसोबतच कुक्कुटपालन, मत्सशेती, दुग्ध व्यवसाय अशा जोड धंद्याची कास धरावी. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी शेतकरी मेळाव्याचा उद्देश सविस्तरपणे विषद करून सेंद्रिय शेतीमुळे शेतीचा पोत अबाधित ठेवून मशागतीचा खर्च कमी होतो व उत्पन्न वाढविण्यास मदत होते. तसेच सामुहिक शेती आणि गट शेतीचे महत्व उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमात डॉ. बाहेती, डॉ.के.बी. पाटील, डॉ.एन.बी. शेख यांची समयोचित भाषणे झालीत. शेवटी डॉ. बाहेती यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सत्कारार्थींचे शेतकऱ्यांचे कुटूंबिय व जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील, प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषद सदस्या यमुना रोटे, जैन इरिगेशनचे के. बी. पाटील, केळी संशोधन केंद्राचे डॉ.एन.बी. शेख, तेलबिया संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुदाम पाटील, कृषि केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती उपस्थित होते.