जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा शाखा तसेच अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्था, अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ, संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्था मेहरून, जळगाव अहिर सुवर्णकार समाज सुधारक मंडळ, जळगाव सुवर्णकार कारागीर संघटना, महाराष्ट्र सुवर्णकार संघ आणि संत नरहरी युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७३९ वी पुण्यतिथी उत्साहात संपन्न झाली. हा कार्यक्रम अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यालयात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी नगरसेविका सौ. लताताई अंबादास मोरे, अध्यक्ष संजय विसपुते, अरुण सोनवणे, संजय भामरे, नंदू बागुल, लोटन भामरे, जगदीश देवरे, मेळावा प्रमुख भगवान दुसाने, मेळावा नियोजन समिती प्रमुख बबलू बाविस्कर, उपप्रमुख सुभाष सोनार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली.
यावेळी संजय विसपुते यांनी आपल्या भाषणात समाज संघटनाच्या गरजेवर भर दिला. त्यांनी सांगितले की, “संतांची पुण्यतिथी साजरी करत असताना त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे महत्त्वाचे आहे. समाज संघटित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.” तसेच, श्री संत नरहरी महाराज जयंती शासनस्तरावर साजरी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचेही त्यांनी जाहीर केले. या प्रयत्नांसाठी समाजबांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला जळगाव शहरातील सुवर्णकार समाज बांधव तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन रतनकुमार थोरात यांनी केले.