मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे आयोजित रांगोळी स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

rangoli spardha

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील युवा नेते मंगेश चव्हाण यांच्या मित्र परिवारातर्फे आयोजित ‘उत्सव एकदंताचा’ या गणेशोत्सवानिमित्त १० दिवसाच्या सांस्कृतिक महोत्सवात शहरातील राजपूत मंगल कार्यालय येथे आज (दि.५) भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रांगोळी स्पर्धेला महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला.

 

रांगोळी ही भारताच्या संस्कृतीचे व सौंदर्याचे उत्तम उदाहरण आहे. रामायण व महाभारत कालापासून विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात. आजच्या रांगोळी स्पर्धेत संस्कार भारती व पोट्रेट रांगोळी या दोन प्रकारच्या रांगोळ्यांची स्पर्धा आयोजित केलेली होती. या स्पर्धेसाठी १०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत उत्तम अशा रांगोळ्या काढल्या. संस्कार भारती प्रकारांमध्ये अत्यंत सुरेख, सुंदर व आखीव-रेखीव भव्य अश्या रांगोळ्या काढल्या व पोट्रेट प्रकारांमध्ये बेटी बचाव, शेतकरी आत्महत्या, भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, पाणीबचत अशा अनेक विषयांना धरून रांगोळ्या काढल्या गेल्या. या रांगोळी स्पर्धेच्या उद्घाटनाला मंगेश चव्हाण यांनी उपस्थिती देत प्रत्येक रांगोळी कलाकाराचे कौतुक केले. प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी प्रत्येक कलाकाराला प्रोत्साहन दिले.

रांगोळी स्पर्धेतून सर्वोत्तम प्रथम व द्वितीय असे दोन विजेते निवडले जाणार आहेत. या रांगोळी स्पर्धेतील स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी रांगोळी कलाकार कावेरीताई पाटील व म.सो.बाविस्कर हे उपस्थित होते. तसेच कावेरी ताईंनी स्पर्धेत सहभागी असलेल्या स्पर्धकांचा दोन तासांचा प्रशिक्षण वर्गदेखील घेतला.
उत्सव एकदंताच्या अंतर्गत सिताराम पैलवान मळा येथे शस्त्रास्त्र प्रदर्शन, गड किल्ले प्रदर्शन व प्रभाकर सिंग यांचे वेल्डर आयरण व ब्रासमध्ये बनवलेले शिल्प प्रदर्शन पाहण्यास चाळीसगावकरांनी आवर्जून येण्याचे आवाहनही मंगेश चव्हाण मित्र परिवाराने केले आहे.

Protected Content