नंदुरबार-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षाच्या नातवासह ५० वर्षाच्या आजीचा मृत्यू झाला. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील काजीपूर शिवारात ही घटना घडली. आठवडाभरात नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा मृत्यू झाल्याने परिसरात भीती निर्माण झाली असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तळोदा तालुक्यातील काजीपूर शिवारात अतुल सूर्यवंशी यांच्या शेतात भगदरी येथील कुटूंब रखवालदार म्हणून आहे. नेहमीप्रमाणे साखराबाई तडवी या मंगळवारी दुपारी बकऱ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. बराच उशीर झाल्यावरही साखराबाई घरी परतल्या नाहीत. यामुळे साखराबाई यांची मुलगी बोकाबाई आणि सात वर्षांचा नातू श्रावण तडवी हे साखराबाईच्या शोधात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेताकडे गेले. श्रावण आणि त्याची आत्या बोकाबाई हे शेताच्या बांधाने चालत असतांना बिबट्याने श्रावणवर हल्ला केला. त्याला लगतच्या ऊसाच्या शेतात फरफटत नेले. बोकाबाईने आरडाओरड केली. परंतु, बिबट्या श्रावणला घेवून पसार झाला होता. लगतच्या शेतात काम करत असलेल्या मजुरांना बोकाबाईने सर्व प्रकार सांगितला. भ्रमणध्वनीव्दारे साखराबाईचे कुटूंबिय आणि ग्रामस्थांना याबाबत माहिती देण्यात आली.
ग्रामस्थांनी शोध घेतला असता साखराबाईचे शिर आणि छातीचा अर्धा भाग नष्ट केलेले शरीर आढळून आले. साखराबाईवर बिबट्याने दुपारी हल्ला केल्याचा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. श्रावणचाही मृतदेह सापडला. त्याच्या मानेवर व डोक्यावर खोलवर जखमा झाल्यामुळे आणि रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना बोलावून दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.