बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्याने आघाडीच्या उमेदवारांचा विजय-नाना पटोले

मुंबई प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानपरिषदेतील भाजपच्या पराभवाबाबत भाष्य करत असतांना विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाल्याने आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाल्याचे वक्तव्य केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत विरोधकांच्या टिकेला उत्तर देतांना जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, विधानपरिषद निवडणुकीआधी पाच जागा जिंकण्याच्या वल्गना केल्या जात होत्या. प्रत्यक्षात मात्र याच्या उलटेच झाले. नंदुरबारमध्ये आमच्या कडचे अमरीश पटेल भाजपमध्ये गेल्याने एक जागा आली. ते इकडे आले की, आमचे होतील असा टोला त्यांनी मारला.

अजित पवार पुढे म्हणाले की, पदवीधर निवडणुकीतील पराभव हा भाजपच्या जिव्हारी लागला आहे. विशेष करून नागपुरातील पराभव हा अतिशय धक्कादायक असाच आहे. पुण्यात तर थेट चंद्रकांत पाटील यांच्यकडे धुरा असूनही पराभव झाला. आमचे उमेदवार हे प्रचंड मतांनी निवडून आले. अमरावतीत थोडी चूक झाली असली तरी भाजपचा उमेदवार निवडून आला नसल्याकडे अजित पवारांनी लक्ष वेधले.

दरम्यान, अजित पवार बोलत असतांना विधानसभेचे सभापती नाना पटोले यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यानेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाल्याचे वक्तव्य केले. पटोले यांनी आधी देखील ईव्हीएमबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा मतदान यंत्रांबाबत संशय व्यक्त केला आहे.

Protected Content