



अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर शहरात भव्य वृक्षारोपण सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील श्री अंबरीश महाराज टेकडीवर सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार, सामाजिक बांधिलकी जपत अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पर्यावरणाच्या संवर्धनाची गरज अधोरेखित करत, “निसर्ग संवर्धन ही काळाची गरज असून, पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, ही जबाबदारी म्हणूनच हा उपक्रम हाती घेतला आहे,” असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी यावेळी केले.
या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच महिलामंडळ मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा न देता, पर्यावरणासाठी विधायक कार्य करून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे टेकडी परिसरात हिरवळ वाढण्यास मदत होईल आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, अशी अपेक्षा आहे.



