



मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्रीक्षेत्र कोथळी येथे गेल्या आठवडाभरापासून अत्यंत भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तसेच संगीत श्रीमद् भागवत कथा संकीर्तन ज्ञानयज्ञ सोहळ्याची बुधवारी भावूक व उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ लोकनेते व माजी मंत्री आमदार एकनाथरावजी खडसे (नाथाभाऊ) यांच्या ७५ व्या वर्षात पदार्पणानिमित्त (अमृत महोत्सव) या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या सप्ताहभरापासून संपूर्ण मुक्ताईनगर व कोथळी परिसर टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
सप्ताहाच्या सांगता प्रसंगी श्री संत मुक्ताई फडाचे गादीपती तथा दिंडी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे (मुक्ताईनगर) यांचे काल्याचे रसाळ व प्रबोधनात्मक कीर्तन संपन्न झाले. आपल्या कीर्तनातून त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला, गोपाळकाला तसेच वारकरी संप्रदायातील भक्ती, संस्कार आणि मूल्यांचे प्रभावी निरूपण केले. कीर्तनादरम्यान रवींद्र महाराज हरणे यांनी एकनाथराव खडसे यांच्या संत मुक्ताईप्रती असलेल्या निस्सीम भक्तीचा गौरव केला. एदलाबादचे ‘मुक्ताईनगर’ असे नामकरण करणे, संत मुक्ताई मंदिराचा जीर्णोद्धार, चतुःसीमा निश्चित करणे आणि पंढरपूरहून पांडुरंगाच्या पादुका मुक्ताईनगरला येण्याची परंपरा सुरू करण्यात नाथाभाऊंचे योगदान ऐतिहासिक असल्याचे सांगत महाराजांनी त्यांना उदंड व निरोगी दीर्घायुष्यासाठी मंगलकामना दिल्या.
काल्याच्या कीर्तनानंतर आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य लाडू तुला सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. भव्य तराजूच्या एका पारड्यात नाथाभाऊ विराजमान झाले तर दुसऱ्या पारड्यात प्रसादाच्या लाडूंच्या पेट्या ठेवून त्यांची अनोखी लाडू तुला करण्यात आली. याप्रसंगी माहूर येथील श्री रेणुका माता संस्थानच्या वतीने १५१ किलो (दीड क्विंटल) वजनाचा खारीक-खोबऱ्याचा विशेष हार आणून नाथाभाऊंना अर्पण करण्यात आला. या सोहळ्यास समस्त खडसे परिवार, सतपंथ आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी जनार्दन हरीजी महाराज, कथेचे निरूपणकार ह.भ.प. विशाल महाराज खोले, विविध साधू-संत, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो भाविक उपस्थित होते. सोहळ्यानंतर उपस्थित हजारो भाविकांना काल्याचा व लाडूंचा महाप्रसाद वितरित करण्यात आला.



