
अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेरमध्ये स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी ‘क्रांतीपर्व’ या स्मारकाचे भव्य लोकार्पण माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सातमध्ये उभारण्यात आलेले हे स्मारक नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.

यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले, “डॉ. उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानाला विस्मरणात जाऊ नये, म्हणून हे स्मारक अत्यंत गरजेचे होते. आपण काम करून पुढे जावे, श्रेयवाद नको – ही भूमिका अंगीकारणे आवश्यक आहे.”
स्मारकाच्या लोकार्पणप्रसंगी व्यासपीठावर अशोक पाटील (बाजार समिती सभापती), मुख्याधिकारी तुषार नेरकर, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, जयश्री पाटील, सुभाष चौधरी, पंचायत समिती माजी सभापती श्याम अहिरे, चेतना पाटील, राजू फापोरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हे स्मारक महाराष्ट्र शासनाच्या विशेष योजनेतून ७७ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आले असून, मराठा सेवा संघाच्या मागणीनंतर माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, “२७ एप्रिलपासून क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि शहीद सैनिकांच्या स्मृतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर मंगल कलश यात्रा काढण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील यात्रेचे नेतृत्व माझ्याकडे असून मुक्ताईनगर येथून या यात्रेला सुरुवात होईल.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय पाटील यांनी केले.


