
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूकदार आणि घर खरेदीदारांसाठी मोठी संधी निर्माण करणाऱ्या ‘नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो’चे जळगाव येथे शानदार उद्घाटन करण्यात आले. क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित या तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्स्पोचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वातानुकूलित डोममध्ये उत्साहात पार पडला. या प्रदर्शनामुळे नाशिक आणि आसपासच्या भागातील रिअल इस्टेट प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.

उद्घाटन प्रसंगी महापौर दीपमाला काळे, आमदार राजुमामा भोळे, नितीन लढ्ढा, सुनील झवर, क्रेडाई राज्य उपाध्यक्ष अनिशभाई शहा, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, मानद सचिव तुषार संकलेचा, उपाध्यक्ष व प्रॉपर्टी एक्स्पो प्रमुख मनोज खिवसरा, समन्वयक सागर शाह, सहसमन्वयक अनंत ठाकरे, आयपीपी कृणाल पाटील, सतीश मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना शुभेच्छा देताना “मी देखील नाशिककरच आहे,” असे सांगत नाशिक शहराच्या विकासाची माहिती दिली. आगामी काळात नाशिकमध्ये होणाऱ्या महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा परिस्थितीत क्रेडाई नाशिक मेट्रोने जळगावमध्ये आयोजित केलेले हे प्रदर्शन स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात एक्स्पोचे समन्वयक सागर शाह यांनी प्रास्ताविक केले, तर तुषार संकलेचा यांनी आभार मानले. महापौर दीपमाला काळे आणि आमदार राजुमामा भोळे यांनीही आपल्या मनोगतातून नाशिक आणि जळगावमधील वाढत्या कनेक्टिव्हिटीमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी सांगितले की, नाशिक हे महाराष्ट्रातील एक प्रगत आणि वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळखले जाते. औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याने येथे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी मोठी क्षमता आहे. नागरिकांना या संधींची माहिती एकाच छताखाली मिळावी यासाठी ७ ते ९ मार्च दरम्यान जळगावच्या सागर पार्क ग्राउंड येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिकमधील स्वच्छ हवा, मुबलक पाण्याची उपलब्धता आणि अनुकूल हवामान यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष या शहराकडे वेधले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुंबई आणि पुण्यापासून कमी अंतर तसेच देशातील प्रमुख शहरांशी वाढलेली कनेक्टिव्हिटी यामुळे नाशिकमधील रिअल इस्टेट गुंतवणूक भविष्यात अधिक फायदेशीर ठरेल, असेही त्यांनी सांगितले. चेन्नई–सुरत महामार्ग, नाशिकजवळ विकसित होणारे वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गाला खानदेश एक्सप्रेसवेने जळगावशी सहा पदरी रस्त्याने जोडण्याची घोषणा यामुळे जळगाव आणि नाशिकमधील प्रवास अधिक सुलभ होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सहसमन्वयक अनंत ठाकरे यांनी सांगितले की, आगामी काळात नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे पुढील दीड वर्षांत लाखो भाविक शहरात येणार आहेत. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. विविध क्षेत्रांतील संधी आणि वाढती पायाभूत सुविधा लक्षात घेता भविष्यातील गुंतवणूक म्हणजे नाशिकमधील रिअल इस्टेट गुंतवणूक असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सुमारे २८ वर्षांपासून कार्यरत असलेली क्रेडाई ही देशातील बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी राष्ट्रीय संस्था असून देशातील २३० शहरांतील १३ हजारांहून अधिक बांधकाम व्यावसायिक या संस्थेशी जोडलेले आहेत. जळगावमधील या प्रदर्शनात नाशिकमधील अनेक आघाडीचे विकसक सहभागी झाले असून फ्लॅट्स, प्लॉट्स, फार्महाऊस, शॉप्स आणि ऑफिसेसचे विविध पर्याय येथे उपलब्ध आहेत. प्रदर्शनाची मांडणी आंतरराष्ट्रीय स्तराला साजेशी असून संपूर्ण एक्स्पो वातानुकूलित ठेवण्यात आला आहे.
या तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये नाशिकसह इगतपुरी, कसारा, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी परिसरातील प्रकल्पांची माहितीही उपलब्ध आहे. या प्रदर्शनासाठी अर्बन साइट्स प्रायोजक असून क्रिश ग्रुप आणि ललित रुंगठा सहप्रायोजक म्हणून सहभागी झाले आहेत.
प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले असून जळगाव आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे करण्यात आले आहे.



