डॉ. प्रवीण मुंढे यांना रत्नागिरीकरांचा पुष्प वर्षावात भावपूर्ण निरोप

रत्नागिरी । जळगाव येथे जिल्हा पोलीस अधिक्षकपदी बदली झालेले डॉ. प्रवीण मुंढे यांना आज रत्नागिरीकरांनी ऐतिहासीक निरोप दिला. त्यांच्यावर पुष्पवर्षाव करून त्यांनी सुमारे दोन वर्षे केलेल्या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

रत्नागिरी येथील पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची अलीकडेच जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षकपदी बदली झाली असून ते उद्या अर्थात सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. दरम्यान, रविवारी डॉ. मुंढे यांना अतिशय शानदार असा निरोप देण्यात आला. याप्रसंगी त्यांची सजविलेल्या पोलीस जीपवरून मिरवणूक काढण्यात आली. पोलीस दलातील सहकार्‍यांनी ही जीप स्वत: ओढून नेत डॉ. मुंढे यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. नंतर एका कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला.

बदली हा शासकीय अधिकार्‍यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असतो. बदलीनंतर शब्दसुमनाने अनेकांना निरोप मिळतो पण दिमाखदार सजवलेल्या गाडीतून फुलांचा वर्षाव करत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निरोप देण्याचा ऐतिहासिक क्षण आज रत्नागिरीकरांनी अनुभवला. डॉ.मुंढेवर होणार्‍या या फुलांच्या वर्षावात पोलीस अधिकारी, कर्मचारी,नागरिक आणि जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा सुगंध दरवळत होता. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व समाजाच्या विविध स्तरांमधील नागरिकांनी आपल्या मनोगतातून त्यांच्याविषयी आपले अनुभव सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या निरोपाच्या उत्तर देतांना डॉ.प्रवीण मुंढे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे आभार मानताना त्यांचे प्रेम आणि जिव्हाळा मिळाल्याने काम करू शकलो. गेली दोन वर्ष कशी गेली हे कळलेच नाही असे नमूद करत सर्वांचे आभार मानले.

Protected Content