मुंबई प्रतिनिधी । आज सकाळपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून यामध्ये शिवसेनेचा झेंडा राज्यातील सर्वाधीक ग्रामपंचायतींवर फडकल्याचे स्पष्ट झाले आहे.
काल सकाळी निवडणुकीचे कल समोर आल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपल्याला चांगले यश मिळाल्याचे दावे सुरू केले होते. भाजपने तर राज्यातील सहा हजार गावांमध्ये भाजपचा सरपंच होणार असल्याचा दावा केला होता. मात्र रात्री उशीरापर्यंत चित्र बर्यापैकी स्पष्ट झाले आहे. तर सकाळच्या अद्ययावत आकडेवारीने यात भर टाकली आहे.
आजच्या आकडेवारीनुसार सत्ताधारी शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. शिवसेनेने ३११३ ग्राम पंचायतींवर भगव फडकविला आहे. तर दुसर्या क्रमांकावर भाजपा असून या पक्षाने २६३२ ग्राम पंचायतींवर विजय मिळविला आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या ताब्यात २४०० ग्राम पंचायती आल्या आहेत. काँग्रेसला मात्र तुलनेत कमी म्हणजे १८२३ ग्राम पंचायतींमध्ये यश लाभले आहे. तर राज ठाकरेंच्या मनसेला ३६ ग्राम पंचायती मिळाल्या आहेत. अपक्ष आणि स्थानिक विकास आघाड्यांना २३४४ ग्राम पंचायती जिंकता आल्या आहेत. एका वाहिनीने ही आकडेवारी जाहीर केली आहे.