अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपले धरण तर होणारच आहे, मात्र धरणाचे पाणी थेट शेतात पोहोचविण्यासाठी उपसा सिंचन योजनेसारखी पाईपलाईनद्वारे शेतात पाणी पोहोचविणारी राजस्थानची टेक्नॉलॉजी आपण आणली असून या टेक्नॉंलॉजीमुळे नक्कीच मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या जीवनात नवी संजीवनी येईल अशी भावना माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांनी शासकीय उपसा सिंचन योजना 1 व 2 च्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केली.
शासकीय उपसा सिंचन योजना 1 व 2 चे खेडी (वासरे) येथे थाटात भूमिपूजन करण्यात आले. यावेळी खासदार स्मिताताई वाघ, माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील, धरण जनआंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की निम्न तापी पाडळसरे धरणावरील शासकीय उपसा सिंचन योजनेमुळे पहिल्याच टप्प्यात 25 हजार हेक्टर म्हणजेच सुमारे 70 ते 75 हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार असून दुसऱ्या टप्प्यात हा आकडा दुपटीने वाढलेला असेल, यामुळे शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावणार आहे.
मी काम करणारा माणूस असल्याने काम करूनच दाखवीत असून येणाऱ्या काळात योजना कार्यान्वित झाल्यानंतर शेतकरी भाकरीत आपला चेहरा बघतील असेच काम झालेले दिसेल, गेल्या पाच वर्षात मी पाडळसरे धरण सुप्रमा, महसूल ची नवीन प्रशासकीय इमारत, पंचायत समिती इमारत, बस स्टँड नुतनीकरण, ग्रामीण रुग्णालय चे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर, शहरातील विविध रस्ते, शहरात 200 कोटीची 24 बाय 7 (दररोज पाणीपुरवठा) नवीन पाणीपुरवठा योजना एवढी कामे मार्गी लावली असून या योजनेचे 27 कि.मी पाईप लाईन टाकण्याचे कामही सुरू आहे. त्यासाठी रस्त्यांची कामे थांबवली आहेत. खरे पाहता येणाऱ्या काळात पाण्यासाठी युद्ध होतील अशीच परिस्थिती आहे.
खरे तुम्ही मला निवडून दिले नसते तर हे धरण कधीही झाले नसते, मी भांडलो व पाठपुरावा केला म्हणूनच आता 10 टी.एम.सी चे धरण 17 टी.एम.सी चें झाले आहे. धरणासाठी आवश्यक असलेली चौथी सुप्रमा आपण मिळवली. यात पहिल्या टप्प्यात पाच शासकीय सिंचन योजनांचा समावेश केल्याने शेतकरी बांधवांच्या शेतात बंद पाईपलाईन द्वारे पाणी पोहोचणार आहे. मी गेल्या पाच वर्षात लहान मोठे 110 बंधारे बांधून दाखविल्याने यामुळे वॉटर टेबल वाढणार आहे. येणाऱ्या काळात अमळनेर तालुक्यासाठी अक्कलपाडा धरणामध्ये पाणी आरक्षण करण्याचे प्रयत्न असून यामुळे पांझरा चे पाणी माळन नदी मध्ये पोहोचविता येणार आहे. पुढील दुसऱ्या टप्प्यात सात उपसा योजना आणायच्या असून टप्पा दोनसाठी पाठपुरावा आताच सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यास दोन ते अडीच वर्षे लागतील. पुढील काळात धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश होईल त्यासाठी खासदार स्मिताताई व आपले प्रयत्न सुरू असल्याचे सांगत रेल्वे आणि उद्योग यासाठीही स्मिताताई व मी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार स्मिता वाघ म्हणाल्या धरणासाठी मी व अनिल दादा सतत प्रयत्नशील राहू व धरणाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत लवकरात लवकर समावेश करून तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहू असे सांगितले, आपले भाग्य आहे की धरण होण्याआधीच उपसा सिंचन योजना मार्गी लागताय, हे धरण सर्वासाठी संजीवनी आहे.धरण ची काळजी करू नका ते 100 टक्के पूर्ण होणार आहे, कारण आता सर्व योग जुळून आले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील आपल्या सोबत आहेत. आपले पाडळसरे धरण खाली असल्याने उपसा सिंचन शिवाय पर्याय नव्हता, आता बंद पाईपलाईन मुळे 70 टक्के पाणी शेतात पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुभाष चौधरी यांनी पाडळसरे धरण पूर्ण करण्यासाठी अनिल दादांच्या कार्यकाळात 2019 ते 2024 ला सर्वाधिक प्रयत्न झाले व सर्वाधिक निधी आला व सुप्रमा सह इतर सर्व प्रशासकीय मान्यता मिळाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी पाडळसरे धरण पूर्ण झाले तर लोकांना भाकरीच्या एका बाजूला अनिल दादा तर भाकरीच्या दुसऱ्या बाजूला स्मिताताई व भाकरीच्या पोपड्यात जयश्रीताई दिसतील असे सांगितले. मा.जि.प.सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांनी 2024 विधानसभा निवडणूक प्रचार वेळी आम्ही शेतकऱ्यांना हीच आश्वासन दिले होते की पाडळसरे धरण लवकरात लवकर पूर्ण करून धरणाचे पाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले जाईल त्या दृष्टीने आज होणाऱ्या या उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन समारंभ या त्या दृष्टीने दिलेला आश्वासन पूर्तीचा एक टप्पा पूर्ण होत आहे याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
अशी आहे शासकीय उपसा सिंचन योजना क्र. 1 व 2:
योजना 1-मूळ स्थान: मौजे बोहरा, ता. अमळनेर.,पंपगृह क्षमता: 680 अश्वशक्तीचे 5 पंप.,पाण्याची वाहतूक: 1598 मी.मी. व्यासाच्या 6.6 किमी लांबीच्या नलिकेद्वारे पाणी खेडी (वासरे) येथील वितरण कुंडात सोडले जाईल.पुढील उर्ध्वगामी नलिकेद्वारे 9500 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा.लाभधारक गावं:- अमळनेर तालुक्यातील 21 गावे.अंदाजित खर्च: रु. 330 कोटी.
योजना क्र. २:-. स्थान: मौजे बोहरा, ता. अमळनेर.,पंपगृह क्षमता: 550 अश्वशक्तीचे 2 पंप व 235 अश्वशक्तीचे 2 पंप.,पाण्याची वाहतूक: 862 मी.मी. व्यासाच्या 10.4 किमी आणि 712 मी.मी. व्यासाच्या 6.8 किमी लांबीच्या नलिकेद्वारे धार व करणखेडे येथील वितरण कुंडात पाणी पोहोचविले जाईल. 3765 हेक्टर क्षेत्राला बारमाही सिंचन सुविधा. लाभधारक गावं:- अमळनेर तालुक्यातील 12 गावे.अंदाजित खर्च: रु. 100 कोटी.
प्रकल्पाचे महत्त्व:-अवर्षण प्रवण क्षेत्राचा विकास: प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होऊन उत्पादकतेत वाढ होईल.लाभधारक क्षेत्र: टप्पा 1 अंतर्गत एकूण 25,657 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.
यावेळी मा.जि.प.सदस्य ऍड व्ही आर पाटील, पावभा पाटील, बाजार समिती सभापती अशोक पाटील, श्याम अहिरे, नगरसेवक बिरजु लंबोळे, नरेंद्र संदानशिव, नरेंद्र चौधरी, एल.टी. पाटील, प्रा.सुरेश पाटील, समाधान धनगर, अनिल शिसोदे, मुक्तार खाटीक, इम्रान खाटीक, विनोद कदम, मंदाकिनी पाटील, प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, संदीप पाटील, आशाताई चावरिया यांच्या सह सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, नगरसेवक, बाजार समिति संचालक मंडळ, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.