पाचोरा प्रतिनिधी । मिशन वात्सल्य योजने अंतर्गत कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या पाल्यांना राज्य शासनाकडून पाच लाख तर एक पालक गमावलेल्या पाल्यांसाठी १ हजार १०० रुपये प्रति महिना देणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली,
याविषयी सविस्तर माहिती अशी की, कोरोना काळात ज्या पालकांचे आई व वडील असे दोन्ही पालकांचे निधन झाले असेल त्या पालकांना मिशन वात्सल्य योजने अंतर्गत प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याचे राज्य शासनाने नुकतेच परिपत्रक काढले असून सदरची मदत ही पाल्यांना बचत सर्टीफिकेट देण्यात येणार असून ते पाल्य १८ वर्ष वयाचे झाल्यानंतरच त्यांना ते पैसे काढता येणार आहे.
याशिवाय ज्या पाल्यांचे आई किंवा वडील दोघांपैकी एक कोरोनामुळे मयत झाले असतील त्या पाल्यांना वय वर्ष अठरा होईपर्यंत दरमहा १ हजार १०० रुपये महिना देण्याची योजना शासनाने परिपत्रकानुसार जाहीर केली आहे. याशिवाय ज्या पाल्यांचे केवळ वडिल मयत झाले असतील त्या पाल्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च शासन करणार असून विधवा आईस संजय गांधी निराधार योजनेतून दरमहा १ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, जि. प. सदस्य दिपकसिंग राजपूत, माजी सदस्य उद्धव मराठे, शहर प्रमुख किशोर बारावकर, बाजार समितीचे माजी सभापती अॅड. दिनकर देवरे प्रसिध्दी प्रमुख प्रविण ब्राम्हणे उपस्थित होते. पाचोरा – भडगाव तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांची गुरुवारी उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक झाल्याचेही आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
गेल्या दिड वर्षांपासून कोरोना व्हायरसने थैमान घातल्यानंतर त्यात अनेकांना कायमचे अपंगत्व आले. तर काहींना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यात पाचोरा तालुक्यात ७६ तर भडगाव तालुक्यात ६९ नागरिकांचे निधन झालेले आहे. पाचोरा तालुक्यात ५ बालकांचे तर भडगाव तालुक्यात ३ बालकांचे आई व वडिल अशा दोघांचे निधन झालेले आहे. यासंदर्भात आज गुरुवारी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या उपस्थितीत आढावा बेठक घेवून शासनाने नियोजित केलेल्या समितीचे तालुकास्तरावरील अध्यक्ष म्हणून तहसिलदार कैलास चावडे, सचिव महिला व बाल विकास अधिकारी पदम परदेशी, सदस्य गटविकास अधिकारी अतुल पाटील, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार भागवत पाटील यासह भडगाव तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पाचोरा – भडगाव तालुक्यातील दोन्ही पालक गमावलेल्या ८ बालकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे प्रमाणपत्र देण्यात आले. याशिवाय दोन्ही तालुक्यातील विधवा महिलांना १ हजार रुपये महिला पेंशन व वडिलांचे छत्र हरविलेल्या पाल्यांना मोफत शिक्षण व आई किंवा वडील यापैकी एकाचे निधन झालेले असल्यास त्या पाल्यांना दरमहा सज्ञान होईपर्यंत १ हजार १०० रुपये महिना देण्याची योजना हाती घेण्यात आल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली.
या व्यतिरिक्त ज्या पाल्यांचे आई व वडिल कोरोनामुळे दगावलेले असतील किंवा पती व पत्नीचे निधन झाले असतील ते या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले असतील त्यांनी संबंधित तहसीलदार अथवा महिला बाल प्रकल्प अधिकारी यांचेशी संपर्क करुन त्यांचेकडे असलेले विहीत नमुन्यातील अर्ज भरून आई किंवा वडील अथवा दोघांचा मृत्युचा दाखला कोरोनामुळे मयत झाल्याचे प्रमाणपत्र, उपचार घेतलेल्या डॉक्टरचे कोरोना पॉझिटीव्हचे प्रमाणपत्र सादर करुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ही यावेळी आ. किशोर पाटील यांनी केले.
केंद्राच्या योजनेबाबत आमदारांनी व्यक्त केली नाराजी
कोरोना व्हायरसमुळे ज्या नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यांचे वारसांना केंद्र सरकारने ५० हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. मात्र नंतर घूमजाव करुन ज्या त्या राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन योजनेतून मयताचे वारसांना ५० हजार रुपयांची मदत द्यावी असे सांगितले. त्यामुळे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे सांगत आ. किशोर पाटील यांनी केंद्र सरकार विषयी नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घेवून जनमधील संभ्रम दूर करावा अशी अपेक्षाही आ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.