सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीही चांगली योजना आणली नाही – बच्चू कडू

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या दिशेने निघालेल्या पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू उतरलेत. त्यांनी या प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधत विविध गोष्टींची गॅरंटी देणारे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हमीभावाची गॅरंटी का देत नाही? असा कटू सवाल उपस्थित केला आहे.

बच्चू कडू यांनी नुकताच अमरावतीत माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारवर निशाणा साधला. सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा आम्ही स्वतः या आंदोलनात सहभागी होऊ, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक गोष्टींची गॅरंटी घेत आहेत. मग हमी भावाची गॅरंटी का घेत नाहीत?, असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला.

बच्चू कडू आपल्या टीकेची धार अधिक धारदार करताना पुढे म्हणाले की, हे सरकार पूर्णतः फेल झाले आहे. मी सरकारमध्ये असलो, तरी या सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणत्याही चांगल्या योजना आणल्या नाहीत. सरकारने आपल्या भिकार योजना बंद करून शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. त्यांच्या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या खिशात पैसे येत नाहीत. उलट त्यांचे व्याज कापले जाते. सरकारने आपली डाकेखोरी बंद केली पाहिजे.

बच्चू कडू यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरही निशाणा साधला. देशात एक विकासाचे जाळे आहे. त्या जाळ्यात अशोक चव्हाण अडकलेत. विकासाच्या जाळ्यात अडकल्यानेच अशा गोष्टी होतात. चव्हाण दोनवेळा मुख्यमंत्री राहिले. त्यानंतरही ते भाजपमध्ये का गेले? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण लोकांच्या मनात संभ्रम आहे. तुम्ही दोनवेळा मु्ख्यमंत्री असूनही भाजपमध्ये का गेला? हे स्पष्ट झाले पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.

 

Protected Content