सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील दोन मालमत्तेवर बांधकाम केलेले असतांना बखळ दाखवून खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला. यात शासनाची दिशाभूल करून शासनाचा ९८ हजार २०० रूपयांचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यात फैजपूरचे माजी नगराध्यक्षांसह इतर सहा जणांचा समावेश आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की. यावल तालुक्यातील मौजे फैजपूर येथील गट नंबर १४४४ प्लॉट नंबर ६ आणि प्लॉट नंबर ११ ही मालमत्ता युवराज सुदाम तळेले रा. फैजपूर ता. यावल यांची होती. तळेले हे फैजपूर विकासोमधील कर्जदार असल्याने त्याच्याकडे थकबाकी वसुल करण्यासाठी विकासोने युवराज सुदाम तळेले रा. फैजपूर ता. यावल यांची दोन्ही मालमत्ता लिलाव करून जप्त केली होती. या दोन्ही मालमत्तेवर बांधकाम केलेले असतांना बखळ मालमत्ता दाखवून फैजपूर विविध कार्यकारी सोसायटीच्या कर्ज वाटप विभागातील शासनमान्य विशेष वसुली अधिकारी भगवंत लक्ष्मण पाटील यांनी या दोन्ही मालमत्ता बखळ असल्याचे दर्शवून यावल तालुक्यातील आमोदे येथील सुमाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अनिल विनायक पाटील यांना लिलाव करून सावदा नोंदणी कार्यालयात ८ जुलै २०१३ रोजी नोंदीप्रमाणे कायम खरेदी करून दिली. तीच मालमत्ता अनिल विनायक पाटील यांनी बखळ दाखवून सावदा येथील जितेंद्र प्रकाश पवार यांना ७ मार्च २०१९ रोजी नोंदणी पद्धतीने कायम खरेदी करून दिली. त्यानंतर जितेंद्र पवार हे मयत झाल्याने दोन्ही मालमत्ता वारस कविता जितेंद्र पवार आणि युगंधर जितेंद्र पवार दोन्ही रा. सावदा यांचे नावे झाली. हीच मालमत्ता कविता पवार व युगंधर पवार यांनी देखील तोच कित्ता गिरवत जागेतील बांधकाम न दाखवता बखळ दाखवून फैजपूर येथील माजी नगराध्यक्षा अमिता हेमराज चौधरी आणि नितीन चंद्रकांत पाटील यांच्याशी व्यवहार करून १७ जानेवारी २०२२ रोजी नोंदणी पद्धतीने कायम खरेदी करून देत शासनाचा ९८ हजार २०० रूपयांचा महसूल बुडून शासनाची दिशाभूल केली.
हा प्रकार शासनाच्या लक्षात आल्यानंतर सावदा येथील दुय्यम निबंधक अधिकारी प्रशांत विलासराव कुलकर्णी यांनी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सावदा पोलीस ठाण्यात फैजपूर विकासोतील विशेष वसुली अधिकारी भगवंत लक्ष्मण पाटील, आमोदे येथील सुमाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अनिल विनायक पाटील रा. आमोदे ता. यावल, मयत जितेंद्र प्रकाश पवार (मयत), कविता जितेंद्र पवार आणि युगंधर जितेंद्र पवार तिघे रा. सावदा ता. रावेर, फैजपूर शहराच्या माजी नगराध्यक्षा अमिता हेमराज चौधरी आणि नितीन चंद्रकांत पाटील दोन्ही रा. फैजपूर ता. यावल यांच्याविरोधात गुरनं २२६/२०२२, नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार अनवर तडवी करीत आहे