शासनाकडून राज्यात ई-बाइक टॅक्सीला मंजुरी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेत राज्यात केवळ ई-बाइक टॅक्सीला परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, प्रवाशांना कमी खर्चात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

राज्य सरकारने ई-बाइक टॅक्सी सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी दहा हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना मिळेल, तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन दिले जाईल. ई-बाइक टॅक्सी सेवेमध्ये महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी विशेष धोरण तयार करण्यात येणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. प्रवाशांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, राज्यात केवळ इलेक्ट्रिक बाइक टॅक्सींना परवानगी असेल, तर पेट्रोलवर चालणाऱ्या बाइकना यामध्ये समाविष्ट केले जाणार नाही. कमी खर्चात चांगला प्रवास अनुभवता यावा आणि प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

इलेक्ट्रिक बाइकला प्रोत्साहन देण्याबरोबरच रिक्षा आणि टॅक्सी चालकांनाही दहा हजार रुपयांचे अनुदान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या निर्णयामुळे मुंबईत दहा हजारांपेक्षा जास्त, तर संपूर्ण महाराष्ट्रात वीस हजारांपेक्षा अधिक रोजगार संधी निर्माण होतील, असा विश्वास परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वाहतुकीच्या क्षेत्रात मोठा बदल होणार असून, प्रवाशांना अधिक स्वस्त, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची संधी मिळणार आहे.

Protected Content