बोगस जात वैधता प्रमाणपत्राच्या विरोधात गोर सेनेचे अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात विमुक्त जाती व व्हीजेएनटी या प्रवर्गामध्ये बोगस जात वैधता प्रमाणपत्र मिळविले जात आहे.  घुसखोरी थांबविण्यासाठी सरकारकडून नेमलेली एसआयटी चौकशी रद्द करू नये या मागणीसाठी गोर सेनेच्या वतीने शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, बोगस जात वैधता प्रमाणपत्र संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी गोरसेनेच्या वतीने २०१९ पासून वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने केली. १९ जुलै २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी २५  जिल्ह्यांमध्ये गोर सेनेच्या वतीने केलेले रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. तसेच सध्या चालू असलेल्या  पावसाळी अधिवेशनामध्ये विधानपरिषदेचे आ. राजेश राठोड यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठवला असताना शिंदे फडणवीस व अजित पवार सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यासाठी एसआयटी  नेमणूक करण्याचे आश्वासन दिले. असे असतांना पुन्हा काल ३ ऑगस्ट रोजी एसआयटी  चौकशी रद्द करण्यात आली. त्यामुळे ही एसआयटी  कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये म्हणून गोरसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता निवेदन देण्यात आले. याप्रसंगी गोर सेनाचे जिल्हा सचिव चेतन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड,  भारमल नाईक, जितेंद्र राठोड, अभिजित चव्हाण, किशोर चव्हाण, अनिल नाईक  आदी उपस्थित होते.

Protected Content