सांगली । आमदार गोपीचंद पडळकर यांना आज संपूर्ण महाराष्ट्रात जोरात ‘टिआरपी’ असून ते नक्कीच मंत्री होणार असल्याची स्तुतीसुमने माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी उधळली. व्हॉलीबॉल स्पर्धेच्या निमित्त पडळकरांच्या उपस्थितीत खोतांनी केलेल्या जोरदार टोलेबाजीला उपस्थितांची चांगलीच दाद मिळाली.
हिंदकेसरी पै.मारुती माने यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त पै.भीमराव माने युथ फाऊंडेशन व हिंदकेसरी व्हॉलीबॉल स्पोर्ट्स क्लब कवठेपिरान यांचे वतीने व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आमदार सदाभाऊ खोत sadabhau khot आणि आमदार गोपीचंद पडळकर gopichand padalkar यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा पार पडल्या. यातील उदघाटनाचा सामना आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या संघांमध्ये रंगला.
याप्रसंगी सदाभाऊ खोत म्हणाले की, आमदार गोपीचंद पडळकर टीव्हीवर आले की आज हा माणूस कुणाला काय बोलणार हे बघण्यासाठी लोकं टीव्हीसमोर थांबतात. त्यामुळे पडळकर आता मंत्री पदासाठी तुमचाच नंबर आहे. तुम्ही शंभर टक्के मंत्री होणार आहे. कारण गोपीचंद पडळकर यांचा सध्या महाराष्ट्रामध्ये टीआरपी जास्त आहे.
सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, गोपीचंद बारका गडीय पण अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. गाडी कितीही मोठी असू द्या पण एवढ्या एवढ्या जॅकवर ती गाडी उचलली जाते, असे गोपीचंद पडळकराचे काम असल्याचे उदाहरण देखील त्यांनी दिले. तर, पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना मात्र काहीही बोलण्याचा अधिकार आहे. एकदा माणूस राजकारणामध्ये वयाने ज्येष्ठ झाला की त्यांनी काहीही केले तर माफ असतं, असा टोला त्यांनी लगावला.