भुसावळ प्रतिनिधी । कोळसा वाहून नेणार्या मालगाडीस वरणगावजवळ आज सकाळी आग लागली. मात्र कर्मचार्यांनी प्रसंगावधान बाळगल्यामुळे यात हानी झाली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोळसा वाहून नेणार्या एका मालगाडीला भुसावळ तालुक्यातील वरणगाव रेल्वे स्थानकाजवळ आग लागल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने आग तत्काळ विझवण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण मात्र, स्पष्ट होऊ शकले नाही.
भुसावळ विभागातून मंगळवारी सकाळी एक मालगाडी नागपूरकडून खंडवामार्गे झाशीला जात होती. या मालगाडीमध्ये कोळसा भरलेला होता. गाडीच्या २५ व्या डब्याला (क्र. १२१४०३१०७३४) आग लागल्याचा प्रकार आचेगाव येथील गेट क्रमांक ४ वर असलेल्या गेटमनच्या लक्षात आला. त्याने तत्काळ या प्रकाराची माहिती वरणगाव रेल्वे स्थानकाला कळवली. त्यानुसार रेल्वे स्थानकाच्या प्रबंधकांनी ही गाडी वरणगाव रेल्वे स्थानकाच्या अप सेक्टरमध्ये दुसर्या लूप लाईनवर थांबवली. तत्पूर्वी डब्याला लागलेली आग विझविण्यासाठी वरणगाव आयुध निर्माणीच्या अग्निशमन दलाचे बंबाला पाचारण करण्यात आले होते. डब्याला लागलेली आग ३५ मिनिटात विझविण्यात आली. या प्रकारावेळी अप सेक्टरच्या दुसर्या लूप लाईनवरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.
वर्धा-भुसावळ पॅसेंजरला उशीर
दरम्यान, मालगाडीला लागलेली आग विझवण्यासाठी वरणगाव रेल्वे स्थानकाच्या अप सेक्टरमध्ये दुसर्या लूप लाईनवरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने वर्धा-भुसावळ पॅसेंजरला थांबविण्यात आले होते. तासाभरात परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पॅसेंजर पुढे सोडण्यात आली. या सार्या प्रकारामुळे वर्धा-भुसावळ पॅसेंजरला तासभर उशीर झाला.
पहा : मालगाडीस लागलेल्या आगीचा व्हिडीओ.