जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बालरंगभूमी परिषद जळगाव शाखा व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचं आयोजित करण्यात आलं होतं. त्यास शिक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी “विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक पाया घडविणाऱ्या प्राथमिक शिक्षकांमध्ये बालकांचे कलागुण विकसित करण्याचे सामर्थ्य यावे. यासाठी ही कार्यशाळा निश्चितच उद्याचे यशस्वी कलावंत घडवेल” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले. शिक्षकांसाठीच्या नाट्य कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, “बालकांतील अभिनय, नृत्य, संगीत या गुणांचा विकास त्यांच्या व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आधारभूत ठरणारे गुण आहेत. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला शैक्षणिक पैलू पाडतांना त्यांचा आयक्यू वाढवित असतांना त्यांच्या इक्यू म्हणजे इमोशन कोशंट वाढविण्यासाठी या कला सहाय्यभूत ठरत असतात. आज या कार्यशाळेच्या माध्यमातून रचल्या गेलेल्या पायावर निश्चितच जळगावातील बालकलावंत पुढे जाऊन यशस्वी कलावंत ठरतील, असा मला विश्वास आहे.”
कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वलन व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शाहीर विनोद ढगे व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केसीई संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोषाध्यक्षा प्रा.डॉ.शमा सराफ, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अजित चौधरी, बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कार्यशाळेचे वक्ते शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सदस्य संदीप घोरपडे (अमळनेर) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर नाट्यरंग थिएटर्स, जळगाव निर्मित अमोल ठाकूर लिखीत – दिग्दर्शित पुस्तक एके पुस्तक या बालनाट्याचा प्रयोग करण्यात आला. मुलांच्या मनात असलेली वेगवेगळ्या विषयांची भीती, मिळणारे कमी गुण, अधिक गुणांसाठी असलेला पालकांचा आग्रह या विषयावर हसत खेळत भाष्य करणाऱ्या या आगळ्या वेगळ्या बालनाट्याच्या प्रयोगाला उपस्थित शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
या बालनाट्यात संस्कृती पवनीकर, मयंक ठाकूर, अंशा चव्हाण, शर्वा जोशी, नेहा वंदना सुनिल, कृतिका कोरे, केतकी कोरे, कृष्णा पाटील, विकास वाघ, चंद्रकांत चौधरी, अमोल ठाकूर, अथर्व रंधे हे कलावंत तर तांत्रिक बाजू प्रकाश योजना – स्वप्निल गायकवाड, रंगभूषा व वेशभूषा – दिशा ठाकूर, पार्श्वसंगीत – दर्शन गुजराती, धनश्री जोशी, रंगमंच व्यवस्था – राहुल वंदना सुनील, ज्ञानेश्वर वाघ, सचिन महाजन, दीपक महाजन, रोहन चव्हाण यांनी सांभाळल्या होत्या.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांनी अनौपचारिक शिक्षणातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व सांस्कृतिक अंगांचा विकास करत एकूणच त्यांच्या व्यकिमत्वाचा सर्वांगिण विकास कसा करता येईल यावर उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांमधील निरीक्षणशक्ती व कुतुहल निरनिराळ्या खेळांमधून कसे वाढवावे या विषयी ‘बालनाट्य आणि शिक्षकांची भूमिका’ या विषयावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सदस्य संदीप घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बालरंगभूमी परिषदेचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी, सदस्य व महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे श्याम ठाकरे, कैलास तायडे, देवेंद्र चौधरी, गोविंदा लोखंडे, निलेश मोरे, राहुल चौधरी, निखिल जोगी, प्रतिक्षा पाटील, सुनिल पवार, कैलास थोरवे, गणेश लोडते, सैय्यद जाकिर अली, शेख जाकीर अहेमद, उमाकांत नाथबुवा, सोमनाथ लोखंडे, चंद्रकांत पाटील, विनोद शेलवडकर, केतन ब-हाटे यांनी परीश्रम घेतले.