जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी! जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २२ जुलै २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी १० वाजता गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, पी-५१, एम सेक्टर, अतिरिक्त एमआयडीसी, भुसावळ रोड, जळगाव येथे सुरू होईल.
या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक नामांकित खासगी आस्थापना आणि उद्योजक कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यामुळे विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना त्यांच्या शिक्षणानुसार रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतील.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नियोजित ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्यामुळे जिल्ह्यातील शिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवण्याची चांगली संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.
कंपन्यांसाठी आवाहन:
या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या खासगी आस्थापना आणि उद्योजक कंपन्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home या संकेतस्थळावरील ‘Employer’ विभागात लॉगिन करून “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ऑफलाईन – ०२ (२०२५-२६)” या टॅबखाली आपल्याकडील रिक्त पदांची नोंद करावी. ज्या कंपन्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड नाही, त्यांनी प्रथम या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी:
या मेळाव्यासंबंधी अधिक माहितीसाठी किंवा काही अडचणी असल्यास, इच्छुकांनी ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत (सकाळी ९:४५ ते संध्याकाळी ६:१५) संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.



