Home Cities जळगाव शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: सिंचनासाठी राज्य सरकारचे मोठे अनुदान !

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: सिंचनासाठी राज्य सरकारचे मोठे अनुदान !

0
162


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाने ‘प्रत्येक थेंब अधिक पीक’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना मोठे पाठबळ दिले आहे. या योजनेतर्गत विविध सिंचन योजनांच्या समन्वयातून या शेतकऱ्यांना ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

राज्यात ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने’अंतर्गत सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना २५ टक्के, तर इतर शेतकऱ्यांना ३० टक्के पूरक अनुदान मिळते. याव्यतिरिक्त, ‘प्रत्येक थेंब अधिक पीक’ योजनेत लाभ मिळालेल्या अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना’ आणि ‘बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना’ यांद्वारे अतिरिक्त पूरक अनुदान दिले जाते.

या दोन्ही योजनांच्या समन्वयामुळे लाभार्थ्यांना एकूण मंजूर खर्चाच्या ९० टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळू शकतो. यामध्ये ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने’तून मिळणाऱ्या अनुदानाबरोबरच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनांमार्फत उर्वरित १० ते १५ टक्के अनुदान दिले जाते.

ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून, यामुळे सिंचन सुविधा वाढून पीक उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळत आहे. कृषी विभागाने राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना या योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound