जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट परिसरातून एका तरुणाची ८० हजार रुपये किंमतीची महागडी दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. यासंदर्भात २७ फेब्रुवारी रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय सुनिल शिंदे (वय-२७) रा. आव्हाने ता. जि. जळगाव हा तरुण मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अजय शिंदे हा (एमएच १९ डीयू ५०३४) क्रमांकाच्या दुचाकीवरुन जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात असलेल्या गायत्री फुल भंडारजवळ कामाच्या निमित्ताने आला होता. त्याठिकाणी त्याने त्याची ८० हजार रुपये किंमतीची दुचाकी पार्क करून लागली व कामानिमित्त निघून गेला. त्यानंतर काम आटोपून दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी जागेवर मिळून आले नाही. त्यांनी दुचाकीचा परिसरात शोधाशोध केली, परंतु कुठेही मिळून न आल्याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली व अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे करीत आहे.