जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या सहकार आणि बँकिंग क्षेत्रात विश्वासाचे स्थान निर्माण केलेल्या गोदावरी लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा २५ वा वर्धापनदिन तथा रौप्यमहोत्सवी वर्ष अत्यंत धार्मिक आणि मंगलमय वातावरणात साजरे करण्यात आले. या निमित्ताने बँकेच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. बँकेचे संचालक राजेंद्र शिवराम महाजन आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते विधिवत आणि भक्तिभावाने श्री सत्यनारायणाचे पूजन करण्यात आले.
या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला गोदावरी बँकेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, बँकेचे व्हाइस चेअरमन सोनू भंगाळे, सुभाष पाटील यांच्यासह बँकेचे सर्व संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालक प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने आणि सहकार भारतीचे राज्यस्तरीय अध्यक्ष संजय बिर्ला यांची विशेष उपस्थिती लाभली. यासोबतच बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने या मंगलमय सोहळ्यात सहभागी झाले होते.
गेल्या पंचवीस वर्षांपासून सहकार, पारदर्शकता, विश्वास आणि ग्राहकभिमुख आर्थिक सेवांच्या माध्यमातून गोदावरी लक्ष्मी बँकेने ग्राहकांची मने जिंकली आहेत. बँकेच्या या यशस्वी वाटचालीचा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करत उपस्थित मान्यवरांनी बँकेच्या आजवरच्या प्रगतीचा गौरव केला आणि आगामी काळातील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले.
गोदावरी लक्ष्मी बँकेच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त संचालक राजेंद्र शिवराम महाजन यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बँकेच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचा गौरव करत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.




