Home क्रीडा धुळे विभागीय स्पर्धेत गोदावरी इंजिनिअरिंगचा झंझावात; पूर्वा चौधरीची तिहेरी सुवर्ण कमाई

धुळे विभागीय स्पर्धेत गोदावरी इंजिनिअरिंगचा झंझावात; पूर्वा चौधरीची तिहेरी सुवर्ण कमाई


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धुळे येथे पार पडलेल्या विभागीय कराटे, तायक्वांदो आणि वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी दणदणीत कामगिरी करत महाविद्यालयाचा क्रीडा दबदबा अधोरेखित केला. विशेषत: पूर्वा चौधरी हिने तिहेरी सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले असून काजल सोनवणे हिनेही सुवर्ण व रौप्यपदक जिंकत दुहेरी यश मिळवले आहे.

ही स्पर्धा एस. एस. व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धुळे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर व जळगाव विभागातील संलग्न महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विविध प्रकारांत उच्च दर्जाची स्पर्धा रंगली.

तृतीय वर्ष एआयअँन्डडीएस अभियांत्रिकी शाखेतील पूर्वा नारायण चौधरी हिने तायक्वांदो (५३ किलो) गटात प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर वुशू (५५ किलो) आणि कराटे (५२ किलो) या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदके जिंकून तिने तिहेरी विजेतेपदाची ऐतिहासिक नोंद केली. तिच्या वेगवान हालचाली, अचूक तंत्र आणि आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे परीक्षक व प्रेक्षकांकडून तिचे विशेष कौतुक करण्यात आले.

तसेच तृतीय वर्ष एआयअँन्डडीएस शाखेतील काजल कैलास सोनवणे हिने कराटे (४५ किलो) प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला, तर वुशू (४३ किलो) प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयासाठी दुहेरी यश संपादन केले. सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळे हे यश शक्य झाल्याचे क्रीडा विभागाने नमूद केले.

या दोन्ही खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विशेष अभिनंदन करत आगामी आंतरविद्यापीठ व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा क्षेत्रात अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनीही कौतुक केले.


Protected Content

Play sound