‘बाबरी मशिदीचे अवशेष द्या’ ; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

SupremeCourtofIndia

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर मुसलमान पक्षकारांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता बाबरी मशिद कृती समितीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बाबरी मशिद कृती समितीने मोडकळीस पडलेल्या बाबरी मशिदीचे अवशेष कृती समितीला सोपवण्याची मागणी केली आहे.

राम जन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याच्या सुनावणीदरम्यान मशिदीच्या अवशेषांचे काय होणार, याचा कधीही उल्लेख झाला नाही. आता ही जमीन राम मंदिर न्यासाकडे सोपवण्यात आली असल्याने लवकरच या जागेवरील मशिदीच्या वास्तूचे अवशेष हटवले जाणार आहेत. या स्थितीत हे अवशेष बाबरी मशीद कृती समितीकडे सोपवण्यात यावेत, अशी विनंती समितीने केलेल्या अर्जात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला होता. या निकालानंतर २ डिसेंबर रोजी पक्षकार एम. सिद्दीकी यांनी सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. २१७ पानी फेरविचार याचिकेत घटनापीठाने दिलेल्या निकालास स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली होती. सिद्दीकी यांच्यासह एकूण १८ फेरविचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यातील ९ याचिका खटल्यातील पक्षकारांनी तर इतर ९ याचिका अन्य व्यक्तींनी दाखल केल्या होत्या. या सर्व याचिका १२ डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने फेटाळून लावल्या होत्या. बंदिस्त केबिनमध्ये पाच सदस्यीय घटनापीठाने सर्व १८ याचिकांवर एकत्रित सुनावणी घेऊन या याचिका फेटाळल्या.

Protected Content