जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यात प्रामुख्याने दहीहंडी गोविंदांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या पाच टक्के आरक्षणामधील नोकरी हा वादाचा विषय ठरला.
जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे म्हणाले की, “महाराष्ट्रातील या नियमबाह्य राज्यसरकारने खेळाडूंच्या खेळाच्या कुठल्याही नियमांचा अभ्यास न करता दहीहंडीतील गोविंदांना खेळाडूंच्या पाच टक्के नोकरीच्या आरक्षणामध्ये स्थान दिले. परंतु राज्य सरकारने कुठल्याही तांत्रिक बाबींचा अभ्यास न करता दहीहंडी खेळातील सहभागी हजारो गोविंदामधून कोणत्या गोविंदाला कोणत्या शैक्षणिक अटींवर राज्य सरकार पाच टक्के खेळाडूंमधील जागांमध्ये नोकरी देणार आहे..? दहीहंडी खेळाला खेळाचा दर्जा राज्य सरकारने दिला, परंतु या खेळामध्ये महाराष्ट्रातील किती पालक आपल्या पाल्यांना या खेळामध्ये सहभागी होण्याकरता उत्स्फूर्तपणे पाठिंबा देतात..? केवळ आपली राजकीय पोळी भाजण्याकरता व मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ मुंबईमधील गोविंदांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याकरिता हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला केवलवाणा प्रयत्न आहे.
राज्य सरकारने गोविंदाचे दोन अवयव निकामी झाल्यास साडेसात लाखांची आणि एक अवयव निकामी झाल्यास पाच लाखांची मदत जाहीर केली असून मृत गोविंदास दहा लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याऐवजी राज्य सरकारने ठोस मदत गोविंदांना जाहीर करावी. असे म्हणत ‘जखमी गोविंदास किंवा त्याच्या वारसास शैक्षणिक अटीवरती राज्य सरकारमध्ये नोकरी व मृत गोविंदाच्या वारसाचा शैक्षणिक अटी शर्तींची पूर्तता करून राज्य सरकारमध्ये नोकरी देण्यात देऊन ठोस मदत गोविंदांना द्यावी.’ अशी मागणी जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
“अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्यसेवेची भरती प्रक्रिया बंद पडलेली असताना राज्य सरकारने अशा पद्धतीची तोंडसुख घोषणा करणे. म्हणजेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आमच्यासारख्या विद्यार्थिनींवरती हा एक प्रकारचा अन्याय असल्याची प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेली विद्यार्थिनी चैताली महाजनने याप्रसंगी दिली आहे.
तर “राज्य सरकारच्या या घोषणेनंतर आता जणू काही असे वाटते आहे की वाचनालय व पुस्तके सोडून कुठलेतरी गोविंदा पथक स्थापन करावे व दहीहंडी फोडण्याची सराव सुरू करावा. जेणेकरून आम्हाला नोकरी मिळेल.” अशी बोचरी प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेले चेतन राजपूत यांनी दिली
“राज्य सरकारने खेळाडूंसाठी राखीव असलेल्या पाच टक्के आरक्षणामध्ये दहीहंडी गोविंदांचा समावेश कशाच्या शैक्षणिक आधारावरती केला. याची स्पष्टता सरकारने जाहीर करावी. म्हणजेच आम्हालाही कळेल की पदवी घेऊन आम्ही चुकी तर केली नाही किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करून आम्ही सर्वात मोठी चूक तर केली नाही या पद्धतीची जाणीव देखील आम्हाला होईल.” अशी प्रतिक्रिया स्पर्धापरीक्षेची तयारी करणारे राहुल पाटील यांनी दिली.
पुढील वर्षीपासून दरवर्षी दहीहंडी संपूर्ण राज्यभरात सुरू झाली तर त्याच्या माध्यमातून जे काही गोविंदा जखमी होतील किंवा मृत होतील याला जबाबदार राज्य सरकार राहील. त्यामुळे या घोषणेचा परत विचार करावा. अशी मागणी जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. यावेळी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगर अध्यक्ष मुजिब पटेल, चेतन राजपूत, राहुल पाटील, चैताली महाजन, गायत्री देवरे, हर्षल दाणी, मयूर शेंगदाणे, आदी युवक-युवती पदाधिकारी उपस्थित होते.