मराठा तरूणांना नियुक्तीपत्रे द्या : आ. चंद्रकांत पाटील

कोल्हापूर । मराठा आरक्षणाबाबत कायद्यासंदर्भात खल न करता समाजातील तरूणांना तातडीने नियुक्तीपत्र द्यावेत अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोल्हापुरातील मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होतांना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मराठा समाजाने कोल्हापुरात निदर्शने आणि लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. काळ्या फिती लावून करण्यात येत असलेल्या या आंदोलनात चंद्रकांत पाटील यांनीही भाग घेतला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणाबाबत कोर्टात काय करायचं ते करा. पण दोन वर्षे कायदा असताना मराठा तरुणांच्या लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा आणि शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. त्यांची निवडही करण्यात आली. पण त्यांना नियुक्तीपत्रं देण्यात आलं नाही. त्यात कायद्याचा खल काय करता? मला कायदा आणि नियुक्तीपत्रं कसं काढायचं हे शिकवू नका. मी पाच वर्षे खाते संभाळले आहे. आजच्या आज मराठा तरुणांना नियुक्तीपत्रं देण्याचा आदेश काढा, अशी मागणी त्यांनी केली.

मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी जे जे लोक आंदोलन करतील त्या आंदोलनात भाजपचा झेंडा न घेता आणि भाजपचा कार्यकर्ता असल्याची ओळख न दाखवता आम्ही सहभागी होणार आहोत, असं मी म्हणालो होतो. त्यानुसार आम्ही या आंदोलनात सहभागी झालो आहोत. कोल्हापुरातील सर्व तालमी, सर्व संघटना आणि मंडळांनी पुढाकार घेऊन हे लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. या लाक्षणिक उपोषणाचं पुढे काय होतं हे माहीत नाही. या आंदोलनात भाजपचा अध्यक्ष म्हणून नव्हे तर नागरिक म्हणून मी आलो आहे, असं पाटील म्हणाले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.