जळगाव, प्रतिनिधी | परिवर्तन जळगावचे संस्थापक अध्यक्ष, ख्यातनाम रंगकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ते शंभू पाटील यांना नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे अतिशय मानाचा गिरणा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
नाशिकच्या गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे गेल्या २४ वर्षांपासून साहित्य, सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींना गौरवण्यात येते. यावर्षी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्या मान्यवरांना पुरस्कार जाहीर झाले. त्यात जळगाव येथील परिवर्तनचे अध्यक्ष व जेष्ठ नाटककार शंभू पाटील यांना या वर्षाचा गिरणा गौरवफ पुरस्कार जाहीर झाला.
नाट्यक्षेत्रात अनेक वर्षांपासून केलेले कार्य, परिवर्तनच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांमुळे शंभू पाटील यांची निवड केल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. शंभू पाटलांच्या रूपाने नाट्यक्षेत्रातील कलावंताला पहिल्यांदाच सन्मानित करण्यात येत आहे. येत्या ५ एप्रिल रोजी मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित राजेंद्र सिंह यांच्याहस्ते पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी डॉ. भालचंद्र नेमाडे, सिंधूताई सपकाळ, सदाशिव अमरापूरकर यासारख्या महाराष्ट्रातील प्रमुख लेखक व कलावंतांना सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर आता याच पुरस्काराने शंभू पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ रंगकर्मींचा गौरव करण्यात येणार आहे.