गिरीशचंद्र मुर्मू यांनी स्वीकारला कॅगचा कार्यभार

नवी दिल्ली । जम्मू-काश्मिरचे माजी नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांनी आज नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्री मुर्मू यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली.

गिरीशचंद्र मुर्मू हे देशाचे चौदावे कॅग असून राजीव महर्षी यांच्या जागी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. मुर्मू यांनी देवाच्या नावाने हिंदीमध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

ओडिशाच्या मयूरभंज येथे जन्मलेल्या मुर्मू हे गुजरात कॅडर मधील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. नरेंद्र मोदी सरकारने गेल्या वर्षी त्यांना केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्त केले होते. १ ऑक्टोबरला त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. पंतप्रधानांचे विश्‍वासू सनदी अधिकारी म्हणून ख्यात असणार्‍या मुर्मू यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींचे प्रधान सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. यामुळे आता त्यांची कॅग या महत्वाच्या पदावर झालेली नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.

Protected Content