जळगाव, प्रतिनिधी | शहीद नायक कुंडलिक माने यांच्या वीर मातापित्यांनी जळगाव येथे आले असतांना युवाशक्ती फौंडेशनच्या पुढाकाराने पालक मंत्री ना. गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी ना.महाजन यांनी कोल्हापूर येथील जिल्हाधिका-यांशी बोलून शहीद माने यांचे त्यांचे गावी स्मारक बांधण्यासाठी सूचना केल्या.
नायक कुंडलिक माने हे पाकिस्तान सीमेवर झालेल्या गोळीबारात शहीद झाले होते. ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील रहिवासी होते. त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या गावात स्मारक व्हावे अशी इच्छा त्यांच्या मातापित्यांची होती. शुक्रवारी शहीद माने यांचे मातोश्री नानूबाई माने आणि पिता केरबा माने जळगावात एका कार्यक्रमासाठी आले असता युवाशक्ती फौंडेशनच्या पुढाकाराने पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी स्मारकाविषयीची इच्छा वीरमाता नानूबाई आणि केरबा माने यांनी व्यक्त केली. ना. महाजन यांनी तत्काळ कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधत पिंपळगाव बुद्रुक येथे स्मारक बांधण्याविषयी सूचना केल्या. तसेच लेखी पत्र देखील माने परिवाराकडे दिले. यामुळे शहीद कुंडलिक माने यांचे मातापित्यांनी त्यांचे आभार मानले. भेटीवेळी युवाशक्तीचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडिया, राहुल चव्हाण, प्रशांत वाणी, संदीप सूर्यवंशी, मनजित जांगीड उपस्थित होते.