मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वेदांतावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतांना आता यात राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन यांनी उडी घेत आधीच्या सरकारवर टीका केली आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातमध्ये गेल्यावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मविआ नेत्यांनी यावरून विद्यमान सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले आहे. तर शिंदे सरकारने देखील पाठपुरावा केला असला तरीही हा प्रोजेक्ट आधीच गुजरातमध्ये गेल्याचा दावा केला आहे. यावरून दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांशी भिडले आहेत. यातच आता ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी उड घेतली आहे.
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलतांना ना. गिरीश महाजन म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला वाईनबाबत बैठका घेण्यासाठी वेळ होता. त्यांना दारूच्या किंमती कमी करण्यसाठी वेळ होता. मात्र वेदांताबाबत बैठक घेण्यासाठी वेळ नसल्याने हा प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी ते राज्य सरकारवर अनाठायी टीका करत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांना टार्गेट करतांना गिरीश महाजन म्हणाले की, गेल्या निवडणुकीत मोदींच्या नावावर यांचे आमदार आणि खासदार निवडून आले. स्वकर्तृत्वावर यांचे दोन सुध्दा खासदार येऊ शकले नसते. मात्र मोदींमुळे अठरा निवडून आले तरी ते टीका करत आहेत. आधी त्यांनी राजीनामा देऊन निवडून दाखवावे असे आव्हान गिरीश महाजन यांनी याप्रसंगी केले.