मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ग्लोबल टिचर पुरस्काराने सन्मानीत रणजितसिंह डिसले यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावरील कारवाईची शक्यता असतांनाच माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे.
आंतरराष्ट्रीयस्तरावर ख्याती मिळवलेले रणजितसिंह डिसले गुरूजी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तर प्रशासनाने चौकशी करून अहवाल तयार केला असून यात डिसले यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. यात गैरहजेरीसह अन्य बाबींचे त्यांच्यावर आरोप होत आहेत. यामुळे डिसले यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. एकीकडे हा सर्व गोंधळ सुरू असतांना माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आ. गिरीश महाजन यांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधत मदतीची ग्वाही दिली आहे.
रणजितसिंह डिसले यांनी राजीनामा देऊ नये अशी भाजपची भूमिका असून यासाठी त्यांनी आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी, अशी गळ आमदार गिरीश महाजन यांनी घातली आहे. या प्रश्नी महाजन यांनी पुढाकार घेत शुक्रवारी डिसले गुरूजी यांच्याशी दुरध्वनीद्वारे संवाद साधला. या अनुषंगाने आज डिसले गुरूजी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. या भेटीकडे आता शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.