जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज Exclusive | राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या एका चाहत्याने त्यांना आफ्रिकेतला टांझानिया देशातून हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
ना. गिरीश महाजन यांचा वाढदिवस काल विविध लोकल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. स्वत: गिरीशभाऊंनी आपला वाढदिवस साजरा करू नये तसेच यासाठी कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी करू नये असे आवाहन केले होते. तसेच, वाढदिवसाला ते जामनेरला नव्हे तर सहकुटुंब मुंबईला होते. अर्थात, त्यांची उपस्थिती नसतांनाही त्यांच्या चाहत्यांनी आपापल्या परीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यात जामनेर तालुका वा जळगाव जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यातून त्यांना शुभेच्छा मिळाल्या. मान्यवरांसह सर्वसामान्यांचा यात समावेश होता. तर यातील एका शुभेच्छेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मूळचा जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथील मयूर गवळी हा तरूण सध्या पूर्व आफ्रिकेतील टांझानिया या देशात व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला आहे. ‘बिझनेस कन्सल्टंट’ म्हणून काम करणार्या गवळी यांची मायदेशासोबत जुडलेली नाळ कायम आहे. यातच तो आपल्या मतदारसंघाचे आमदार गिरीश महाजन यांचा चाहता आहे. दिनांक १७ मे रोजी गिरीशभाऊंचा वाढदिवस त्याने टांझानियात साजरा केला. यात तेथील ख्यातनाम वकील फोरगेथ मोंगी तसेच त्यांच्या स्थानिक मित्रमंडळाने वाढदिवस साजरा करत भाऊंना शुभेच्छा दिल्यात. यानिमित्त वकील फोरगेथ मोंगी यांनी गिरीशभाऊंना दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडीओ सोशल मीडियात ‘व्हायरल’ झालेला आहे.
या संदर्भात मयूर गवळी यांच्याशी ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ने वार्तालाप केला असता, त्यांनी आमचे भाऊ हे राज्यातील महत्वाचे नेते गणले जात असून त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास झाला असल्याने आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे नमूद केले. अर्थात, गिरीशभाऊंच्या वाढदिवसाला आफ्रिकेतून आलेल्या या शुभेच्छा हटके आणि खास मानल्या जात आहेत.